नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकार विरोधात विरोधकांनी गेल्या काही दिवसांपासून रान उठवले आहे. राफेल, सीबीआय विवादावरून काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी भाजपाला धारेवर धरत आहेत. मात्र असे असले तरी सध्यातरी देशातील जनमत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या बाजूने असल्याचे चित्र असून, आज घडीला निवडणुका झाल्यास भाजपाच्या नेतृत्वाखालील भाजपाला 300 जागा मिळण्याची शक्यता एबीपी न्यूज आणि सी - व्होटरच्या सर्व्हेत वर्तवण्यात आली आहे. एबीपी न्यूज आणि सी-व्होटर यांनी केलेल्या जनमत चाचणीनुसार अद्यापतरी देशातील जनमत मोदींच्या बाजूने असल्याचे चित्र आहे. या सर्व्हेनुसार उत्तर प्रदेशमध्ये महाआघाडी झाल्यास भाजपाला फटका बसू शकतो. मात्र महाआघाडी न झाल्यास भाजपाल बंपर यश मिळू शकेल. तसेच बिहार, ओदिशा आणि पश्चिम बंगालमध्येही भाजपाला यश मिळण्याची शक्यता आहे. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमत मिळाले होते. तसेच भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएलाही सव्वातीनशेहून अधिक जागा मिळाल्या होत्या. मात्र देशातील सध्याच्या बदलत्या परिस्थितीमुळे जनमत मोदी सरकारच्याविरोधात जात असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. त्या पार्श्वभूमीवर या सर्व्हेमुळे भाजपाला दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
आत्ता निवडणुका झाल्या तर कौल नरेंद्र मोदींनाच, एनडीएला मिळणार 300 जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 8:50 PM