आज निवडणुका झाल्या तर कुणाला मिळेल सत्ता?; जाणून घ्या, देशातील जनतेचा कौल
By ऑनलाइन लोकमत | Published: January 26, 2023 09:41 PM2023-01-26T21:41:15+5:302023-01-26T21:41:33+5:30
आज निवडणुका झाल्या तर निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, या प्रश्नावर जनतेने कौल दिला
नवी दिल्ली - इंडिया टूडे-सी वोटरनं एकत्र येत मूड ऑफ द नेशन सर्व्हे केला आहे. ज्यात NDA सरकारच्या कामावर देशातील जनतेचा मूड जाणून घेण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. जानेवारी २०२३ रोजी केलेल्या सर्व्हेत एकूण १ लाख ४० हजार ८१७ लोकांनी सहभाग घेतला. त्यात अनेक ज्वलंत प्रश्नावर लोकांनी मते व्यक्त केली. मोदी सरकारच्या एकूण कामगिरीवर किती समाधानी आहात? आज जर निवडणुका झाल्या तर देशात कुणाचं सरकार बनेल? NDA सरकारचं सर्वात मोठं यश आणि अपयश काय आहे. जाणून घेऊया या सर्व्हेत लोकांनी काय मत व्यक्त केलीत.
NDA सरकारच्या कामावर लोकांनी पसंती व्यक्त केली आहे. ६७ टक्के लोकांनी खूप चांगले, ११ टक्के लोकांनी फक्त चांगले आणि १८ टक्के लोकांनी खराब कामगिरी असल्याचं म्हटलं आहे. लोकांनी कोरोनाच्या लढाईत मोदी सरकारने केलेल्या कामाचं कौतुक केले आहे. २० टक्के लोकांचे म्हणणं आहे की मोदी सरकार कोरोनाच्या लढाईत यशस्वी झाले. तर कलम ३७० हटवणे १४ टक्के, राम मंदिर बांधकाम ११ टक्के आणि जन कल्याण योजनेवर ८ टक्के लोकांनी यशस्वी कामगिरी म्हटली आहे.
मोदी सरकारचे सर्वात मोठे अपयश?
त्याचवेळी सर्वात मोठे अपयश या प्रश्नावर २५ टक्के लोकांनी महागाई सांगितली आहे. १७% बेरोजगारी, ८% कोविड-१९शी संबंधित, ६% लोकांनी आर्थिक विकास सांगितले.
विरोधी पक्षात असलेल्या काँग्रेसच्या कामावर तुम्ही किती खूश आहात?
विरोधी पक्ष म्हणून काँग्रेसच्या कार्यपद्धतीबाबतही जनतेला विचारण्यात आले आहे. यामध्ये १९ टक्के लोकांनी खूप चांगले, १५ टक्के चांगले, १९ टक्के सरासरी आणि २५ टक्के वाईट म्हटले आहे.
भारत जोडो यात्रेबद्दल काय मत आहे?
भारत जोडो यात्रेबाबतही लोकांनी मते दिली आहेत. २९ टक्के लोकांनी जनतेशी संपर्क साधण्याचा हा चांगला निर्णय असल्याचं म्हटलं आहे. ३७ टक्के लोकांनी पक्ष मजबूत करण्यासाठी ठीक असल्याचं सांगितले. १३ टक्के लोकांनी राहुल गांधींची प्रतिमा सुधारण्यासाठी पावले उचलल्याचे सांगितले. त्याचवेळी ९ टक्के लोकांनी पक्षाला काही फरक पडणार नसल्याचे सांगितले.
आज निवडणुका झाल्या तर निवडणुकीत कोणत्या पक्षाला किती जागा मिळतील, या प्रश्नावर जनतेने कौल दिला. भाजपला २८४, काँग्रेसला ६८ आणि इतरांना १९१ जागा मिळण्याची शक्यता आहे. दुसरीकडे, मतांच्या टक्केवारीबद्दल बोलायचे झाल्यास, भाजपला ३९ टक्के, काँग्रेसला २२ आणि इतरांना ३९ टक्के मते मिळण्याची शक्यता आहे.