ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. १३ - दिल्ली मेट्रोतून प्रवास करताना प्रवाशांना चेहरा झाकता येणार नाही आहे. दुपट्टा, मफलर किंवा मास्कच्या सहाय्याने चेहरा झाकला असेल तर मेट्रो स्टेशनच्या आत प्रवेशच करु दिला जाणार नाही. राजेंद्र प्लेस मेट्रो स्टेशनवर झालेल्या 12 लाखांच्या चोरीच्या पार्श्वभुमीवर केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाने (सीआयएसएफ) हा निर्णय घेतला आहे.
दिल्ली मेट्रो स्थानकांवर सुरक्षेत असलेल्या त्रुटींचा आढावादेखील घेतला जात असल्याची माहिती वरिष्ठ अधिका-यांनी दिली आहे. सीआयएसएफने घेतलेल्या या निर्णयामुळे प्रवासी तिकीट खिडकीवर पोहोचण्याआधी व्यवस्थित तपासणी केली जाईल. 'तपासणीदरम्यान प्रत्येकाला चेह-यावरील मास्क काढून टाकायला सांगण्यात येणार आहे. प्रत्येकाचा चेहरा सीसीटीव्हीमध्ये कैद केला जाईल. एखाद्याला गंभीर आजार असेल तर मास्क ठेवण्याची परवानगी देण्यात येईल', अशी माहिती अधिका-याने दिली आहे.