नवी दिल्ली: मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सरकारला आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण करण्याची विनंती केली आहे. राजस्थानच्या झुंझुनू जिल्ह्यातील एका कार्यक्रमाच्या वेळी स्थानिक पत्रकारांशी बोलताना सत्यपाल मलिक म्हणाले, 'जर शेतकऱ्यांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर हे सरकार पुन्हा सत्तेत येणार नाही.'
राज्यपाल म्हणाले की, भाजप नेते आता उत्तर प्रदेशातील अनेक गावांमध्ये प्रवेश करू शकत नाहीत. मी मेरठचा आहे, कोणताही भाजप नेता माझ्या भागातील कोणत्याही गावात प्रवेश करू शकत नाही. मेरठमध्ये, मुझफ्फरनगरमध्ये, बागपतमध्ये ते प्रवेश करू शकत नाहीत. जेव्हा त्यांना विचारण्यात आलं की, शेतकऱ्यांसोबत उभे राहण्यासाठी आपले पद सोडतील का? त्यावर मलिक म्हणाले, शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा आहे आणि सध्या पद सोडण्याची गरज नाही. पण गरज असेल तेव्हा तसेही करेल.
शेतकऱ्यांसाठी पंतप्रधान आणि गृहमंत्र्यांशी बोललोसत्यपाल मलिक पुढे म्हणाले, शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या मुद्द्यावर मी अनेक लोकांशी लढा दिला आहे. पंतप्रधान, गृहमंत्री, प्रत्येकासाठी त्यांच्याशी भांडलो आहे. मी सर्वांना सांगितले आहे की तुम्ही चुकीचे करत आहात, ते करू नका. शेतकरी तीन कायद्यांचा मुद्दा वगळू शकतात कारण सर्वोच्च न्यायालयाने त्यावर स्थगिती आणली आहे. तुम्ही फक्त MSPची गॅरेंटी द्या, पण तुम्ही तसं करत नाहीयेत.
शेतकरी आणि सरकारमध्ये मध्यस्थी करण्यास तयार
ते पुढे म्हणाले की, पंतप्रधानांना सार्वजनिकरित्या कोणताही संदेश देणार नाही, परंतु वैयक्तिकरित्या त्यांचे मत मांडेल. तुम्ही एमएसपीची हमी द्या, मी शेतकऱ्यांना तीन कायद्यांबद्दल समजावून सांगेन. त्यांना किमान आधारभूत किमतीची हमी मिळाली पाहिजे, त्यापेक्षा कमी ते तडजोड करणार नाहीत.
जम्मू-काश्मीरमधील हत्यांवर भाष्ययावेळी सत्यपाल मलिक यांनी जम्मू-काश्मीरमध्ये अलीकडच्या काळात स्थानिक नागरिकांच्या झालेल्या हत्यंवर भाष्य केलं. ते म्हणाले, मी राज्यपाल होते तेव्हा दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या 50 किमी आत प्रवेश करण्याची हिंमत केली नाही. तेव्हा काहीही होत नव्हतं, ना दगडफेक होत होती, ना दहशतवादी भरती होत होती. पण, आता ते उघडपणे शहरातील लोकांना मारत आहेत.