शिवसेनेच्या 'सामना' या मुखपत्रात प्रजासत्ताक दिनी दिल्ली झालेल्या हिंसेला देशविरोधी कृत्य असल्याचं म्हटलं आहे. पण त्याच वेळी लाल किल्ल्यावर झालेल्या हिंसेत दिप सिद्धचं नाव समोर आल्यावरुन त्याचे भाजपसोबतच्या संबंधांवरुन काही सवाल उपस्थित केले आहेत.
"शेतकरी आंदोलन भडकावे, हिंसाचार करावा व आंदोलन बदनाम व्हावे ही सरकारची इच्छा होतीच. २६ जानेवारीच्या मुहूर्तावर ही सुप्त इच्छा पूर्ण करुन घेतली असेल तर त्याने देशाची बदनामी झाली, शेतकऱ्यांनी कायदा हातात घेतला असे बोलणे सोपे आहे, पण कृषी कायदा रद्द करा असा आक्रोश साठ दिवसांपासून सुरू आहे. त्या कायद्याला इतके कुरवाळून का बसला आहात?", असा घणाघात शिवसेनेनं भाजपवर केला आहे.
शेतकऱ्यांच्या हाती दुसरं काय असणार?"शेतकऱ्यांच्या हाती नांगर, ट्रॅक्टर आणि दंडुका नसेल तर दुसरे काय असेल? दिल्लीच्या रस्त्यावर जी दंडुकेशाही झाली त्याची जबाबदारी फक्त शेतकरी आंदोलकांवर टाकून चालणार नाही. जे सरकारला हवे होते तेच घडवून आणण्यात आले. त्यात बळी गेले ते शेतकऱ्यांचे आणि रस्त सांडले ते पोलीस व जवानांचे", असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
दीप सिद्धू कोण हे भाजपने सांगावेलाल किल्ल्यावर घुसून ज्या झुंडीने हडकंप माजवला, त्या झुंडीचे नेतृत्व कुणीएक दीप सिद्धू करीत होता. हा सिद्धू पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांच्या गोटातला असल्याची माहिती समोर आली आहे. पंजाबमधील भाजपचे खासदार सनी देओल याच्याशी त्याचे घनिष्ट संबंध आहेत, असंही शिवसेनेनं म्हटलं आहे.
भाजप नेत्यांच्या विधानांवरही शरसंधानशेतकरी नेते राजेश टिकैत यांच्या व्हायरल व्हिडिओवरून प्रश्न उपस्थित केले जात असल्याच्या मुद्द्यावरुनही शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. "राजेश टिकैत यांनी शेतकऱ्यांना हातात काठी घ्यायचे आवाहन करताच ते गुन्हेगार ठरवले गेले, पण 'गोली मारो', 'खतम करो' असे भडकावू भाषण देणारे संत मंडळ आज मोदींच्या मंत्रिमंडळात आहे", असं शिवसेनेनं अग्रलेखात म्हटलं आहे.