ऑनलाइन लोकमत
मुझफ्फरनगर, दि. ११ - उत्तरप्रदेशमधील मुझफ्फरनगर येथे छेडछाड़ीच्या घटनांवर लगाम लावण्यासाठी स्थानिक प्रशासनाने एक भन्नाट मोहीम राबवली आहे. महिला व मुलींची छेड काढणा-या रोडरोमिओंना एका पिंज-यात ठेवले जाणार आहे. विशेष बाब म्हणजे हे पिंजरे शाळा - कॉलेजेसजवळ ठेवले जाणार असून यामुळे रोडरोमिओंची नाचक्की होऊन छेडछाडीच्या घटना कमी होतील असे प्रशासनाचे म्हणणे आहे.
मुझफ्फरनगरमध्ये २०१३ मध्ये छेडछाडीच्या घटनेवरुनच दोन समाजात दंगल झाली होती. जिल्ह्यात छेडछाडीचे प्रकार झाले की दोन गटात तणाव निर्माण होण्याचे प्रकारही वारंवार घडायचे. अखेर यावर तोडगा काढण्यासाठी जिल्हाधिका-यांनी स्थानिक पोलिसांच्या मदतीने एक भन्नाट मोहीमच राबवली आहे. महिला व मुलींची छेड काढणा-या रोडरोमिओंना दोन दिवसांसाठी पिंज-यात डांबले जाईल व हा पिंजरा मुलींच्या शाळा - कॉलेजेसबाहेर ठेवण्यात येईल. यामुळे रोडरोमिओंची सार्वजनिक ठिकाणी नाचक्की होईल व या प्रकारांवर आळा बसेल अशी आशा वर्तवली जात आहे. मुझफ्फरनगरमधील जिल्हाधिकारी निखीलचंद शुक्ला यांनी मात्र हे वृत्त फेटाळले आहे. 'मी छेडछाडीला रोखण्यासाठी शाळा कॉलेजेसबाहेर पोलिसांची गस्त वाढवण्याचे आदेश दिले होते. पण पिंज-यात ठेवण्याचे कोणतेही आदेश दिलेले नाही' असे शुक्ला यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राला सांगितले.