नवी दिल्ली - मी इथे खुर्च्या उबवायला आलो नाही, जनतेची कामं होत नसतील तर असे निर्णय घ्यावे लागतात अशी थेट टीका देत बंड पुकारणारे खासदार नाना पटोले यांनी केली आहे. मुख्यमंत्री जवळच्याच लोकांच्या वाटेला जातात, पण माझ्या वाटेला जाऊ नये असा इशाराच त्यांनी दिला. नाना पटोले यांनी शुक्रवारी खासदारकीचा राजीनामा दिला. लोकसभा अध्यक्षांकडे नाना पटोले यांनी आपला राजीनामा सोपवला आहे. याविषयी बोलताना मी इथे खुर्च्या उबवायला आलो नाही, जनतेची कामं होत नसतील तर असे निर्णय घ्यावे लागतात असं परखड मत त्यांनी मांडलं आहे. एबीपी माझाला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सरकावर आपली थेट नाराजी व्यक्त केली.
'मी लोकसभा अध्यक्षांना माझा राजीनामा दिला आहे. जर हे सरकार ऐकत नसेल तर पुन्हा जनतेत जाऊन त्यांचं काम करणं महत्त्वाचं आहे', असं नाना पटोले म्हणाले आहेत. 'चुकीच्या निर्णयांचं समर्थन करणार नाही, सरकारने माझा, जनतेचा विश्वासघात केला आहे. मी जनतेच्या आशिर्वादाने खासदार झालोय. कुण्या नेत्याच्या उपकाराने खासदार झालो नाही', असा टोला नाना पटोलेंनी लगावला.
'सरकारने जनतेला अनेक आश्वासने दिली, मात्र त्याची पूर्तता केली नाही, जनतेची फसवणूक केली. इतके दिवस मी बोलत होतो, त्यामुळे आता राजीनामा देतोय, हे कोणत्या भाजप नेत्याला सांगण्याची गरज वाटली नाही', असं ते म्हणाले. 'मी अजून कोणताही राजकीय निर्णय घेतलेला नाही. मी पुढील राजकीय निर्णयाबाबत अजून विचार केलेला नाही. लोकांची इच्छा असेल तर ते मला पुन्हा लोकसभेत पाठवतील, पुन्हा निवडणूक झाली तर जनता माझ्याबरोबरच राहील', असा विश्वास नाना पटोलेंनी व्यक्त केला. जनता माझ्या सोबतच आहे. मी राजीनामा दिल्यानंतर अनेक लोकांचे मला शुभेच्छांचे फोन येत आहेत असंही त्यांनी सांगितलं.
नाना पटोले यांची कारकिर्द
५ जून १९६३ रोजी जन्मलेले ५४ वर्षीय नाना पटोले हे २४ व्या वर्षी राजकीय क्षेत्रात उडी घेऊन १९८७ मध्ये जिल्हा परिषद निवडणूक अपक्ष लढले. त्यानंतर १९९२ मध्ये सानगडी क्षेत्रातून जिल्हा परिषद सदस्य म्हणून निवडून आले. १९९४ मध्ये लाखांदूर विधानसभेची निवडणूक अपक्ष लढले. त्यानंतर काँग्रेसमध्ये प्रवेश करून १९९९ व २००४ अशा दोन निवडणुका त्यांनी जिंकल्या.
त्यानंतर काँग्रेस सरकारच्या शेतक-यांप्रती उदासीन धोरणांविरूद्ध नाना पटोले यांनी डिसेंबर २००८ मध्ये काँग्रेस पक्षाचा राजीनामा दिला. त्यानंतर मे २००९ मध्ये ते लोकसभा निवडणूक अपक्ष लढले. त्यावेळी त्यांनी अडीच लाखांवर मताधिक्य घेतले होते. त्यानंतर जुलै २००९ मध्ये भाजपाचे तत्कालीन नेते गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला. २००९ च्या साकोली विधानसभा क्षेत्रातून भाजपाच्या उमेदवारीवर विदर्भातून सर्वाधिक मताधिक्यांनी विजयी झाले. पुढे २०१४ मध्ये भाजपने लोकसभेची उमेदवारी दिली. राष्ट्रवादी काँग्रेसचे वरिष्ठ नेते तत्त्कालीन केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल यांचा भंडारा मतदारसंघात पराभव केला होता.
मे २०१४ ते मे २०१७ मध्ये भाजपामध्ये सर्व काही सुरळीत सुरू असताना मे महिन्यातच दिल्ली येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्या-त्या राज्यातील समस्यांचा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्रातील खासदारांची बैठक घेतली. त्या बैठकीत पटोलेंच्या शेतकरी व ओबीसी प्रश्नावर मोदींनी हाताने इशारा करीत पटोलेंना बसायला लावले होते, तेव्हापासून नाना पटोले हे मोदींच्या कार्यपद्धतीवर नाराज होते.
त्यानंतर स्वपक्षाच्या धोरणांवर नाराज असलेले नाना पटोले यांनी जुलै महिन्यात नागपुरात एका स्वयंसेवी संस्थेच्या कार्यक्रमात केंद्र सरकारच्या शेतकरी धोरणाविरूद्ध टीका करीत शेतकरी कर्जमाफीच्या मुद्यांवरून देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य केले होते. त्यानंतर नोटाबंदी आणि जीएसटीवर पुणे येथे आयोजित माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांच्यासोबत केंद्राच्या धोरणावर टीका केली. त्यापूर्वी यवतमाळ, अमरावती, कोल्हापूर येथील कार्यक्रमात त्यांचा स्वपक्षावर हल्लाबोल सुरू होता. अलीकडेच डिसेंबर महिन्यात अकोल्यात शेतक-यांसाठी यशवंत सिन्हा यांनी केलेल्या आंदोलनात पटोले हे पूर्ण वेळ सहभागी झाले होते.