वारंगल : कुणालाही लाच देऊ नका. तुम्ही अधिका-यांना लाच दिल्यास तुम्हालाच ठार मारेन असा इशारा तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी रविवारी येथे जाहीर सभेत दिल्याने खळबळ उडाली आहे.काही अधिकारी तुम्हाला लाच मागत असतील तर तुम्ही ०४०-२३४५४०७१ हा क्रमांक डायल करावा. मी संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई करेन. मात्र नंतरचे त्यांचे वाक्य स्थानिक रहिवाशांना धक्का देऊन गेले. तुम्ही जर या अधिकाऱ्यांना लाच देत असाल तर तुम्हालाच ठार मारेन असे ते म्हणाले. येत्या दोन दिवसांत लाच प्रतिबंधक टोल फ्री मोबाईल नंबर जारी केला जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले. सध्या राव यांचे विधान राजकीय वर्तुळात टीकेचे कारण बनले आहे.वारंगलच्या लक्ष्मीपुरम भागात झोपडपट्टीवासीयांसाठी गृहनिर्माण प्रकल्पाची कोनशिला बसविण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. तुम्हाला पक्की घरे दिली जातील. तुम्हाला कुणालाही लाच देण्याची गरज नाही. राज्य सरकार आपल्या निधीतून ही घरे बांधून देणार आहे. कोणत्याही अधिकाऱ्याने लाच मागितली किंवा त्रास दिल्यास उपरोक्त नंबर डायल करा, असे ते म्हणाले. राव यांनी वारंगलमधील अमीरनगर, गांधीनगर, प्रशांतनगर, आंबेडकरनगर, जितेंद्रनगर, एस.आर. नगर आणि साकाराशी कुंटा झोपडपट्टी तसेच हनामकोंडा भागात गृहनिर्माण वसाहतींचा शिल्यान्यासही केला. या भागात ४०० कोटी रुपये खर्चून ३९५७ घरे बांधली जाणार आहेत. राव यांनी गेल्या चार दिवसांपासून वारंगल येथे मुक्काम ठोकला असून त्यांनी लाभार्थ्यांची ओळख पटविण्यासाठी स्वत: झोपडपट्टीवासीयांशी चर्चा केली, हे विशेष. हा प्रकल्प जूनपर्यंत पूर्ण केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. (वृत्तसंस्था)
अधिका-यांना लाच दिल्यास जिवे मारेन
By admin | Published: January 12, 2015 11:58 PM