बंगळुरू - कर्नाटकमधील भाजपचे आमदार बसनगौडा पाटील यांनी वादग्रस्त वक्तव्य केले आहे. जर मी गृहमंत्री असतो, तर बुद्धिजीवी लोकांना गोळ्या मारण्याचे आदेश दिले असते, असे पाटील यांनी म्हटले तसेच उदारमतवादी आणि बुद्धिजीवी हे देशद्रोही असल्याचे पाटीलही ते म्हणाले. नुकतेच कर्नाटक निवडणुकीत पाटील हे विजयपूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले आहेत.
कारगिल विजय दिवसानिमित्त आयोजित आदरांजली कार्यक्रमात बोलताना भाजप आमदार बसगौडा पाटील यांचा तोल सुटला. बुद्धिजीवी लोकांकडून भारतीय सैन्याविरोधात नारेबाजी केली जाते. तर या लोकांकडून देशातील सर्वच सुविधांचा लाभ घेण्यात येतो, ज्यासाठी आपण टॅक्स देतो. सध्या देशाला धोका या बुद्धिजीवी आणि धर्मनिरपेक्ष लोकांपासून असल्याचे पाटील यांनी म्हटले. यापूर्वीही पाटील यांनी वादग्रस्त विधान केले होते. पारसी लोकांनी मुस्लिमांना मदत करु नये, असे आवाहनच त्यांनी पारसी नागरिकांना केलं होतं. दरम्यान, पाटील हे अटलबिहारी वाजपेयींच्या सरकारमध्ये केंद्रीयमंत्री राहिले होते.