साधारणपणे दोन वर्षांपूर्वी आपल्या एका वादग्रस्त विधानानंतर, राजकीय पटलावरून जवळपास गायब झालेल्या भाजपच्या माजी नेत्या नुपूर शर्मा यांनी अखेर मौन सोडले आहे. त्यांनी गाझियाबादमधील रामप्रस्थ ग्रीन कॅम्पस येथे आयोजित भागवत कथेदरम्यान, अनेक मुद्द्यांवर आपले मत मांडले. यावेळी, या देशात सनातनींना संपविण्याचे षडयंत्र रचले गेले, जे आपण अनुभवले असल्याचा आरोपही त्यांनी केला.
राहुल गांधींचे नाव न घेता नुपूर म्हणाल्या, "जेव्हा एखाद्या उच्च पदावरी लोक हिंदू हिंसक आहेत, असे बोलतात अथवा सनातना नष्ट करायला हवे, असे इतर काही लोक बोलतात, तेव्हा हे षड्यंत्र समजायला हवे. जर हिंदू हिंसक झाले असते, तर आपल्याच देशात एका हिंदू मुलीला एवढ्या सुरक्षा व्यवस्थेत रहावे लागले नसते. ते काही बोलले, तर 'वाह-वाह' आणि मी काही बोलले तर 'सिर तन से जुदा', असे चालणार नाही. आपला देश आपल्या संविधानाने चलेल, कुठल्याही धर्माच्या कायद्याने अथवा शरिया कायद्याने चालणार नाही."
तत्पूर्वी, 1 जुलैला लोकसभेमधील राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील चर्चेदरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी म्हणाले होते, "भारत हा अहिंसेचा देश आहे, तो घाबरत नाही. आपल्या महापुरुषांनी भीऊ नका आणि कुणाला घाबरू नका, असा संदेश दिला आहे. शिव शंकर म्हणतात, भिऊ नका, घाबरवू नका. तर दुसरीकडे, जे स्वत:ला हिंदू म्हणवतात ते 24 तास हिंसा-हिंसा-हिंसा... द्वेष-द्वेष-द्वेष... आपण हिंदू नाहीच. सत्याच्या बाजूने उभे रहायला हवे, असे हिंदू धर्मात स्पष्ट शब्दात लिहिले आहे."
राहुल गांधींच्या या वक्त्यवावर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उभे राहून हे गंभीर असल्याचे म्हटले होते. पंतप्रधान मोदी म्हणाले होते, संपूर्ण हिंदू समाजाला हिंसक म्हणणे गंभीर गोष्ट आहे. यावर पुन्हा राहुल गांधी म्हणाले होते, पंतप्रधान मोदी आणि भाजप म्हणजे, संपूर्ण हिंदू समाज नाही.