ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १९ - अरुणाचलप्रदेश संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाच्या निकालामुळे संधी मिळालेल्या काँग्रेसने मंगळवारी लोकसभेमध्ये केंद्र सरकारला धारेवर धरले. केंद्र सरकार काँग्रेस शासित राज्यातील सरकारे अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहे असा आरोप लोकसभेतील काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला.
सरकारच्यावतीने केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी हा आरोप फेटाळून लावला. काँग्रेसमधले अंतर्गत वाद अरुणाचलप्रदेशमधील घडामोडींना जबाबदार आहेत. होल असेल तर बोट बुडणारच असे राजनाथ सिंह म्हणाले.
एकाबाजूला नरेंद्र मोदी सरकार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे १२५ वे जयंतीवर्ष साजरे करत आहे आणि दुस-या बाजूला लोकशाहीची हत्या करत आहे. काँग्रेस मुक्तीचा जो तुम्ही नारा दिला आहे कुठल्याही मार्गाने त्याची अंमलबजावणी करायचे ठरवले आहे. जेव्हा तुम्हाला संधी मिळते तेव्हा तुम्ही सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करता. उत्तराखंडमध्ये, अरुणाचलमध्ये तुम्ही हे करुन पाहिले. लोकांसाठी आणि संविधानासाठी हे चांगले नाही असे खर्गे म्हणाले.