नवी दिल्ली : भाजपने काँग्रेस नेते दिग्विजय सिंह आणि जयराम रमेश यांचे नक्षलवाद्यांशी संबंध असल्याचा आरोप केल्यानंतर दोन्ही पक्षांमध्ये घमासान सुरु झाले आहे. आधी देशद्रोही आता नक्षलवादी ठरविण्यात आल्याने भाजप सरकारने इथेच मला अटक करावी, अशी मागणी दिग्विजय सिंह यांनी केली आहे.
(कथित नक्षलवाद्यांच्या तपासाचे कागदपत्र भाजपकडे कसे आले? काँग्रेसचा सवाल)भाजपच्या संबित पात्रा यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये मनमोहन सिंह, दिग्विजय सिंह यांच्यासह काँग्रेस नेते नक्षवाद्यांचे समर्थक होते असा गंभीर आरोप केला होता. यावरून दिल्लीमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या आहेत. संबित पात्रा यांनी कथित नक्षलवाद्यांशी संबंधीत लोकांच्या अटकेनंतर पोलिस करत असलेल्या चौकशीची कागदपत्रे पत्रकारांसमोर ठेवली होती. ही कागदपत्रे भाजपच्या प्रवक्त्याकडे कशी आली, असा सवालही काँग्रेसने उपस्थित केला आहे.
पात्रा यांनी या कागदपत्रांमध्ये दिग्विजय सिंह यांचा मोबाईल नंबर असल्याचा आरोप केला होता. यावरून मोदी सरकारविरोधात बोललो म्हणून मला देशद्रोही ठरवण्यात आले. आता नक्षलवाद्याचा ठपका ठेवण्यात आला. एवढच असेल तर आता पत्रकार परिषदेतूनच अटक करावी, असे आव्हान सिंह यांनी भाजपला दिले.