कोरोना काळातील घोटाळ्यांवरून इकडे महाराष्ट्रात राजकारण सुरु असताना तिकडे कर्नाटकात देखील भाजपा आमदाराने तत्कालीन स्वपक्षीय नेत्यांविरोधात शड्डू ठोकले आहेत. मला पक्षातून काढून टाकले तर कोरोना काळात अव्वाच्या सव्वा दर लावून पैसे लुटणाऱ्या आणि मालमत्ता बनविणाऱ्या लोकांची भांडाफोड करण्याचा इशारा बसनगौडा पाटील यत्नाळ यांनी दिला आहे.
कोरोना काळात येडीयुराप्पा सरकारने ४० हजार कोटी रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप यत्नाळ यांनी केला आहे. या लोकांनी प्रत्येक कोरोना रुग्णाचे ८ ते ९ लाखांचे बिल बनविले होते. ४५ रुपयांच्या मास्कची किंमत ४८५ रुपये ठेवण्यात आली होती, असा आरोप आमदारांनी केला आहे.
तेव्हा आमचे सरकार होते. मला यामुळे काहीही फरक पडत नाही की सत्तेत कोणाचे सरकार होते. चोर तो चोरच असतो. बंगळुरुमध्ये १० हजार बेडची व्यवस्था करण्यात आली होती. यासाठी भाड्याने १० हजार बेड आणण्यात आले होते. जेव्हा मला कोरोना झाला तेव्हा मणिपाल हॉस्पिटलने पाच लाख ऐशी हजार रुपये मागितले होते. गरीब माणूस एवढे पैसे कुठून आणू शकला असता, असा सवाल यत्नाळ यांनी उपस्थित केला आहे.
मला नोटीस देऊन माझी पक्षातून हकालपट्टी करावी. मी सर्वांचा पर्दाफाश करीन. सगळेच चोर झाले तर राज्य आणि देश कोण वाचवणार? पंतप्रधान मोदींमुळे देश वाचला असल्याचे वक्तव्य यत्नाळ यांनी केले आहे.
सिद्धरामय्या म्हणाले, आता कुठे लपलेत...
भाजप आमदाराने आपल्याच सरकारवर केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवरून कर्नाटकात राजकारण तापणार असून मुख्यमंत्री सिद्धरामय्यांची प्रतिक्रियाही आली आहे. यत्नाळ यांच्या आरोपांमुळे आम्ही जे भ्रष्टाचाराचे आरोप करत होतो त्यांना पुष्टी मिळत आहे. भाजपा सरकार म्हणजे ४० टक्के कमिशन सरकार होते. यत्नाळ यांच्या आरोपांवर विचार केला तर हा भ्रष्टाचार आमच्या अंदाजापेक्षा १० पटींनी अधिक आहे. आम्ही आरोप केल्यानंतर भाजपाचे मंत्री जोरजोरात ओरडत सभागृहाच्या बाहेर आलेले ते आता कुठे लपले आहेत, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी उपस्थित केला.