ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २ - पठाणकोट येथील भारतीय हवाई दलाच्या तळावरील दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार जैश-ए-मोहम्मदचा प्रमुख मसूद अझरने पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानला धमकी दिली आहे.
भारता विरुध्द दहशतवादी कारवाया करणा-या अतिरेकी संघटनांवर बंदी आणली तर गंभीर परिणाम भोगावे लागतील असा इशारा त्याने पाकिस्तानी नेतृत्वाला दिला आहे.
मी जे लष्कर तयार केले आहे ते आनंदाने मृत्यूला सामोरे जायला तयार आहे. माझ्या लष्कराला मूळापासून उखडून फेकणे आमच्या शत्रूला शक्य होणार नाही. देवाच्या इच्छेने माझे लष्कर शत्रूंना आनंदी राहू देणार नाही तसेच त्यांना माझी कमतरताही जाणवणार नाही असे अझरने पेशावरमधील अल कलाम या जिहादी नियतकालिकात लिहीलेल्या लेखात म्हटले आहे.
पाकिस्तान नेतृत्वाकडून मशिद, मदरसे आणि जिहाद विरुध्द सुरु असलेली कारवाई देशाच्या अखंडतेसाठी धोका असल्याचेही त्याने म्हटले आहे.