दिल्ली सरकारच्या मंत्री आतिशी या अडचणीत आल्या आहेत. मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी आरोपी विजय नायर हा आतिशी आणि भारद्वाज यांच्याशी थेट संपर्कात होता, असा जबाब दिल्याचा दावा ईडीने कोर्टात केला आहे. यावरून आता आतिशी यांनी आपचे आणखी चार नेत्यांना अटक होणार असून मी भाजपात नाही गेले तर महिनाभरात मी पण जेलमध्ये असेन असा दावा केला आहे.
भाजपाने माझ्या एका निकटवर्तीयाकडून संदेश दिला आहे. मी भाजपात नाही गेले तर ईडी मला अटक करणार आहे. काही दिवसांत ईडी माझ्या घरी छापा मारणार आहे. आपच्या चार नेत्यांना पुढील दोन महिन्यांत तुरुंगात टाकण्याचा कट रचला जात आहे. यामध्ये माझ्यासह सौरभ भारद्वाज, दुर्गेश पाठक आणि राघव चड्ढा यांचा समावेश आहे, असा दावा आतिशी यांनी केला आहे.
मी आज भाजपाला सांगू इच्छिते की आम्ही तुमच्या धमक्यांनी घाबरणारे नाहीत. आम्ही भगतसिंहांचे चेले आहोत, केजरीवालांचे शिपाई आहोत. जोपर्यंत आपच्या प्रत्येक कार्यकर्त्यामध्ये शेवटचा श्वास असेल तोवर आम्ही देशाला वाचविण्यासाठी काम करत राहू, असे त्या म्हणाल्या.
ईडीने मुद्दामहून माझे आणि भारद्वाज यांचे नाव कोर्टात घेतले असावे. हा जबाब ईडी आणि सीबीआयकडे गेल्या दीड वर्षांपासून उपलब्ध होता. हे वक्तव्य सीबीआयच्या चार्जशीटमध्ये आहे आणि ईडीकडेही आहे. मग आताच या जबाबावर बोलण्यात काय अर्थ होता, असा सवालही आतिशी यांनी केला आहे.