पंजाबमधून निवडून आलेला खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंग याने नुकतीच लोकसभेच्या खासदारकीची शपथ घेतली. त्यानंतर अमृतपाल याने त्याच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात अमृतपालने त्याच्या आईने केलेलं विधान खोडून काढलं आहे. तसेच आईने केलेल्या वक्तव्याबाबत समजलं तेव्हा माझं मन दुखावलं गेलं. जर पंथ आणि परिवार यापैकी एकाची निवड करायची झाल्यास मी पंथ निवडेन, असे अमृतपाल सिंग याने स्पष्ट केले आहे.
आईने केलेल्या विधानावर प्रतिक्रिया देताना अमृतपाल सिंग म्हणाला की, आईने केलेल्या वक्तव्याबाबत जेव्हा मला समजलं तेव्हा माझं मन खूप दुखावलं गेलं. आईने हे विधान अनावधानानं केलं असावं, असं मला वाटतं. मात्र तरीही माझे कुटुंबीय आणि समर्थक यांच्यापैकी कुणीही असं वक्तव्य करता कामा नये. खालसा राज्याचं स्वप्न पाहणं हा काही गुन्हा नाही आहे, तर ती अभिमानाची बाब आहे. ज्या मार्गावर लाखो शिखांनी आपल्या प्राणांचं बलिदान दिलं आहे, त्या मार्गावरून हटण्याचा विचार आम्ही स्वप्नातही करू शकत नाही.
अमृतपाल सिंगने पुढे सांगितले की, मी मंचावरून बोलताना अनेकदा सांगितलं आहे की, जर माझ्यासमोर पंथ आणि परिवार यापैकी एकाला निवडण्याची वेळ आली तर मी नेहमी पंथाची निवड करेन. या पोस्टमध्ये तो पुढे म्हणाला की, मी याबाबत माझ्या कुटुंबाला कधीही फटकारलेलं नाही. शीख राज्याबाबत तडजोडीबाबत विचार करणंही अस्वीकारार्ह आहे. तसेच अशी चूक पुन्हा होऊ शकते.
दरम्यान, अमृतपाल सिंग याने लोकसभा सदस्यत्वाची शपथ घेतल्यानंतर त्याच्या आईने एक विधान केलं होतं. त्यात ती म्हणाली होती की, पंजाबमधील तरुणांच्या बाजूने बोलल्याने अमृतपाल सिंग हा खलिस्तान समर्थक ठरत नाही. तो खलिस्तान समर्थक नाही आहे. पंजाबबाबत बोलणं, पंजाबमधील तरुणांना वाचवणं, यामुळे तो खलिस्तान समर्थक ठरतो का? त्याने घटनेच्या चौकटीत राहुन लोकसभेची निवडणूक लढवली. आता त्याला खलिस्तान समर्थक म्हणता कामा नये, असं विधान अमृतपालच्या आईनं केलं होतं. मात्र स्वत: अमृतपालसिंगनं हे विधान खोडून काढलं आहे.