ऑनलाइन लोकमत
लाहोर, दि. १८ - बीफ खाल्ल्याच्या संशयावरून जमावाने केलेल्या मारहाणीत दादरी येथे एका इसमाला जीव गमवावा लागला ही घटना भारतासाठी अतिशय लज्जास्पद असल्याचे सांगत ज्येष्ठ अभिनेते ओम पुरी यांनी दादरी प्रकरणावर कडाडून टीका केली. ' माझ्या या वक्तव्यावरून भारतातील कट्टरपंथीयांनी मला त्रास दिला तर मी भारत सोडून पाकिस्तानात स्थायिक होईन' असा इशाराही त्यांनी दिल्याचे वृत्त पाकिस्तानी मीडियाने दिले आहे.
तीन दिवसांच्या पाकिस्तान दौ-यावर असलेले ओम पुरी लाहोरमधील अलहामर आर्ट सेंटर येथे पत्रकारांशी संवाद साधत होते, त्यावेळी त्यांनी भारतातील वाढत्या कट्टरतवादावर टीका करतानाच असहिष्णूतेबाबतही मत व्यक्त केले. भारतात बीफ खाण्याच्या मुद्यावरून गदारोळ माजवणा-या लोकांची संख्या मोजकी आहे. आमचा देश मांस निर्यात करून हजारो डॉलर्स कमावतो, मात्र असं असतानाही काही लोकांना गो हत्या बंदी हवी आहे. अशी मागणी करणारे लोक ढोंगी आहेत, अशी कडाडून टीका त्यांनी केली.
देशात ८० ते ९० टक्के लोक सेक्युलर असून ते पाकिस्तानी नागरिकांचा द्वेष करत नाहीत, असे ते म्हणाले. भारतीय समाजातील सर्व नागरिक हिंसक नाहीत, फक्त काही लोकंच संभ्रिमत असून त्यांनाना दोन्ही देशांमधील संबंध बिघडवायचे आहेत. मात्र दोन्ही देशांच्या नागरिकांनी द्वेष सोडून एकमेकांमधील सौहार्दपूर्ण वातावरण जपण्यावर भर द्यावा, असे आवाहन पुरी यांनी केले.
सुप्रसिद्ध गझलगायक गुलाम अली खान यांचा भारतातील कार्यक्रम रद्द झाल्याबाबतही त्यांनी दु:ख व्यक्त केले. हा कार्यक्रम रद्द झाल्याबद्दल मला खंत वाटते असं सांगतानाच दोन्ही देशांनी क्रिकेटवरून राजकारण करू नये, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.