कोलकाता : यंदाची लोकसभा निवडणूक नेत्यांच्या वक्तव्यांनी गाजली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींना लोकशाहीची जोरदार चपराक मारावी वाटते, असे पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी म्हणाल्या होत्या. यावर मोदींसह भाजपाने ममतांना मोदींच्या कानाखाली मारावीशी वाटतेय, असा आरोप केला होता. यावर ममता यांनी आज मोदींना टोला लगावला आहे.
जय श्रीरामच्या घोषणेवरून मोदींनी केलेल्या टीकेला उत्तर देताना ममता म्हणाल्या की, मोदी हे दुर्योधन आणि रावनाचा अवतार आहे. त्यांना लोकशाहीची जोरदार चपराक मारावी वाटते, असे ममता यांनी म्हटले होते. मी स्वत:ला विकून राजकारण करत नाही. आपण कुणालाही घाबरत नसून निडरतेने जगते. मोदी केवळ दंगे भडकवण्यात आग्रेसर आहेत. धर्माच्या नावावर जनतेत फूट पाडत असल्याची टीका ममता यांनी केली होती. यावरून सुषमा स्वराज यांनीही ममतांवर टीका केली होती. तर मोदींनीही ममतांची चपराक आनंदाने स्वीकारेन असे म्हटले होते.
यावर ममतांनी आपण त्यांना कानाखाली मारू असे बोललेच नसल्याचे म्हटले आहे. मोदींना लोकशाहीची चपराक द्यावीशी वाटतेय असे बोलले होते. मी कशाला मोदींना कानाखाली मारू? जर मी त्यांच्या कानाखाली मारली तर माझा हात मोडणार नाही का? त्यांची छाती 56 इंचांची आहे ना, मग मी कशी मारू. मला तुम्हाला कानाखाली किंवा स्पर्श करण्याची सुद्धा इच्छा नाही, असा टोला ममता यांनी लगावला.
ममता यांच्यावर काही दिवसांपूर्वी सुषमा यांनी टीका केली होती. 'ममता जी, आज तुम्ही सर्व सीमा ओलांडल्या आहेत. 'तुम्ही राज्याच्या मुख्यमंत्री आहात आणि मोदी हे देशाचे पंतप्रधान आहेत. उद्या तुम्हाला त्यांच्याशीच जुळवून घ्यायचं आहे. म्हणून तुम्हाला बशीर बद्र यांच्या एका शायरीची आठवण करून देते - दुश्मनी जम कर करो लेकिन ये गुंजाइश रहे, जब कभी हम दोस्त हो जाएँ तो शर्मिंदा न हों' असं ट्वीट स्वराज यांनी केलं आहे. तसेच ममता यांना शेर ऐकवत त्यांच्या वक्तव्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे.