रांची : झारखंडचे शिक्षणमंत्री जगरनाथ महतो हे दहावी पास असून त्यांच्या शिक्षणाबाबत सोशल मीडियात आणि राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चा असते. यावर आता शिक्षणमंत्र्यांनीच भाष्य केले आहे. ते म्हणाले की, जिवंत राहिलो तर कॉलेजचे शिक्षणही लवकरच पूर्ण करेन.
शैक्षणिक अर्हतेवर प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना उत्तर देण्यासाठी महतो यांनी २०२० मध्ये इंटर महाविद्यालयात प्रवेश घेतलेला आहे. शिक्षणासाठी वयाची अट असत नाही, असेही त्यांनी यापूर्वीच स्पष्ट केले आहे. ज्या महाविद्यालयात त्यांनी प्रवेश घेतला आहे त्याची स्थापना त्यांनीच केलेली आहे.
सप्टेंबर २०२० मध्ये त्यांना कोरोना झाला होता. त्यानंतर त्यांना रांची येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. २० दिवसांनंतर त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्यानंतर त्यांना चेन्नई येथील एमजीएम हॉस्पिटलमध्ये विमानाने दाखल करण्यात आले होते. तेथे फुफ्फुसाचे प्रत्यारोपण करण्यात आले होते. जगरनाथ महतो हे एक महिन्यापूर्वीच रांची येथे आले आहेत. त्यांनी सांगितले की, प्रकृती बिघडल्याने वर्ष वाया गेले. पण, जिवंत राहिलो तर पुढील वर्षी शिक्षण पूर्ण करेन.