नवी दिल्ली- मी जर पंतप्रधान असतो तर नोटाबंदीचा प्रस्ताव कचऱ्याच्या डब्यात फेकला असता, असं वक्तव्य काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी केलं आहे. मी पंतप्रधान असतो व नोटाबंदीच्या प्रस्तावाची फाईल माझ्याकडे आली असती तर तो प्रस्ताव सरळ कचऱ्याच्या डब्यात फेकला असता, असं म्हणत राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर पुन्हा निशाणा साधला आहे. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी सध्या दक्षिण आशियातील देशांच्या पाच दिवसांच्या दौऱ्यावर आहेत. राहुल गांधी यांनी आज मलेशियापासून या दौऱ्याला सुरूवात केली असून त्यांनी आज कुआलालंपूरमध्ये भारतीय समुदायाला संबोधित केलं. या कार्यक्रमात राहुल गांधींना प्रश्न विचारण्यात आला. तुम्ही नोटाबंदीचा निर्णय वेगळ्या प्रकारे कसा लागू केला असता? असा प्रश्न राहुल गांधी यांना विचारण्यात आला. त्या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केलं आहे. नोटाबंदीचा निर्णय कुणासाठीही फायद्याचा नाही, असंही राहुल गांधी म्हणाले.
काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या या वक्तव्याचा व्हिडीओ काँग्रेस पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँण्डलवरून शेअर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी नोटाबंदीचा निर्णय लागू करत 500 व 1000 रूपयांच्या नोटा व्यवहारातून हद्दपार केल्या होत्या. मोदींच्या या निर्णयावर काँग्रेस पक्षाने सडकून टीका केली होती.
मलेशियात झालेल्या कार्यक्रमात बोलताना राहुल गांधी यांनी विविध प्रश्नांवर उत्तरं दिली. महिला सशक्तिकरणावर राहुल गांधी यांनी म्हंटलं, महिला सशक्तिकरणासाठी फक्त समानता पुरेशी नाही. महिलांप्रती ज्या प्रकारचा पक्षपात समाजात आहे तो दूर करण्यासाठी पुरूषांच्या मदतीची जास्त गरज आहे. मी महिलांना पुरूषांच्या बरोबर मानत नाही तर त्यांच्यापेक्षा वरचढ मानतो. पश्चिम समाजासह सगळ्याच समाजात महिलांबद्दल पक्षपाती व्यवहार केला जातो. हा विचार बदलण्याची गरज आहे.