मुंबई - दंगल फेम अभिनेत्री झायरा वसीमने विमानात आपल्यासोबत असभ्य वर्तन झाल्याचा खुलासा केल्यानंतर बॉलिवूडमधील अनेक सेलिब्रेटींनी तिला पाठिंबा दर्शवला आहे. या सेलिब्रेटींमध्ये अजून एक नाव जोडलं गेलं आहे, ते म्हणजे कंगना राणौत. आपल्या सडेतोड वक्तव्य आणि स्वभावासाठी प्रसिद्ध असणा-या कंगना राणौतने तर्क लावत बसण्यापेक्षा महिलांच्या सुरक्षेची अजून काळजी घेतली गेली पाहिजे असं मत व्यक्त केलं आहे. कंगना म्हणाली आहे की, 'या मुलीसोबत जे झालं ते खूप वाईट होतं. तिचं समर्थन करण्याऐवजी लोक आपापल्या परिने अंदाज लावत बसले आहेत. तिच्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत'.
'अनेक लोकांचं म्हणणं आहे की त्या व्यक्तीने फक्त आपला पाय तिथे ठेवला होता. माझ्यासाठी हे आक्षेपार्ह आहे. मी तर त्याचे पायच तोडून टाकले असते. या प्रकरणी लोकांना जजमेंटल होण्याची गरज नाही', असं स्पष्ट मत कंगणाने व्यक्त केलं आहे. पुढे ती बोलली आहे की, 'मी कोणत्याही मुद्द्यावर बोलण्यास घाबरत नाही. जर मी बोलले नाही तर दुसरं कोणीतरी बोलेल. माझं नेहमी एक मत असतं, जे मी खुलेपणाने मांडते'.
काय आहे प्रकरण - झायरा वसीमनं आपल्या इन्स्टाग्रामवर विमानातील छेडछाडीचा व्हिडीओ पोस्ट केला होता. झायरा वसीम 9 डिसेंबरला दिल्लीहून आईसह मुंबईला विस्तारा एअरलाइन्सच्या विमानातून येत होती. तिने बिझनेस क्लासचे तिकीट काढले होते. ‘1 एफ’ सीटवर ती व बाजूला तिची आई तर मागील ‘2 एफ’ वर 45 वर्षांचा एक इसम बसलेला होता. नऊ वाजून 20 मिनिटांनी विमानाने उड्डाण घेतले. थोड्याच वेळात संबंधित प्रवाशाने पायाच्या बोटाने झायराच्या मान व पाठीला स्पर्श केला. त्याबाबत सांगूनही दुर्लक्ष करत राहिल्याने अखेर ती घाबरून किंचाळली. मात्र कोणीही कर्मचारी किंवा प्रवासी तेथे आला नाही. झायराने या प्रकाराचे मोबाईलवर शूट करण्याचा प्रयत्न केला, परंतु विमानातील अंधूक प्रकाशामुळे ते शक्य झाले नाही. सुमारे दहा मिनिटे हा सगळा प्रकार सुरू होता. ‘विस्तारा एअरलाइन्स’च्या विमानातून दिल्ली- मुंबई प्रवास करीत असताना घडलेल्या धक्कादायक प्रकाराची माहिती 17 वर्षीय झायराने स्वत: विमानातून उतरल्यानंतर मध्यरात्री ‘इन्स्टाग्राम’वर शेअर केली. ती घटना सांगताना तिला अश्रू रोखता आले नाहीत. त्यानंतर जगभरातून या घटनेबाबत तीव्र प्रतिक्रिया उमटल्या.
मुंबई पोलिसांनी या प्रकाराची दखल घेत संबंधित प्रवाशाविरुद्ध विनयभंग व बालक अत्याचार प्रतिबंधक कलम (पॉस्को) गुन्हा दाखल केला होता. त्याचप्रमाणे राष्ट्रीय व राज्य महिला आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली होती. जम्मू-काश्मीरच्या मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती, कुस्तीपटू बबिता फोगाट यांच्यासह राजकीय, सामाजिक व बॉलिवूडमधील विविध मान्यवरांनी याबाबत सोशल मीडियावरुन निषेध नोंदवत संबंधित विकृत प्रवाशावर कठोर कारवाईची मागणी केली होती.
अटकेची कारवाई - असभ्य वर्तन केल्याचा आरोप केल्यानंतर या प्रकरणी विकास सचदेव या व्यक्तीला सहार पोलिसांनी अटक केली होती. त्याला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने 13 डिसेंबरपर्यंत त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडी संपल्यावर न्यायालयात हजर केलं असता 22 डिसेंबरपर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.