Haryana Assembly Election 2024: हरियाणातील आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्वच पक्षांनी तयारी सुरु केली आहे. याच पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. यादरम्यान, काँग्रेसने हरियाणात सत्ता मिळवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू केले आहेत. यातच काँग्रेसमधील नेत्यांकडून मुख्यमंत्रीपदावर दावा करण्यासाठी गटबाजी होताना दिसून येत आहे. यामध्ये भूपेंद्रसिंग हुड्डा, कुमारी सैलजा आणि रणदीप सुरजेवाला यांचे मुख्यमंत्रीपदाचे दावे पुढे येत आहेत. दरम्यान, मी जर मुख्यमंत्री असतो तर कैथलच्या जनतेला १००-२०० कोटी रुपये दिले असते, असा दावा रणदीप सुरजेवाला यांनी केला आहे.
रविवारी कैथल येथील जाहीर सभेला रणदीप सुरजेवाला यांनी संबोधित केले. यावेळी ते म्हणाले की, "या शहराने मला शहराची सेवा करण्याची, शहराचे चित्र बदलण्याची, या शहरात नवे आयाम, नवी रचना निर्माण करण्याची, विकासाची नवी गाथा लिहिण्याची संधी दिली आहे. मात्र, भाजप सरकारच्या १० वर्षांत हे शहर २० वर्षे मागे गेले आहे, मी ज्या गोष्टी मागे ठेवल्या होत्या, त्या तिथेच पडून आहेत. भाजपने या शहराला नैराश्य आणि निराशेचा बळी दिला आहे", असे म्हणत रणदीप सुरजेवाला यांनी भाजपवर जोरदार हल्लाबोल केला.
पुढे रणदीप सुरजेवाला म्हणाले की, "भ्रष्टाचार बोकाळला आहे, मग तो कौटुंबिक ओळखपत्र असो, मालमत्ता ओळखपत्र असो, परिसरातील जमीनीवर कब्जा असो किंवा दुकानांचे कुलूप तोडणे असो किंवा खंडणी मागणे असो. माझ्या काळात बांधलेल्या गोष्टींना रंगरंगोटीही केलेली नाही, रस्ते जीर्ण झाले आहेत, अपूर्ण राहिलेली कामे आजही अपूर्ण आहेत, त्यांना पुन्हा कोणी हात लावायला आलेले नाही. तसेच, कोणती दृष्टी नाही, कोणता मार्ग नाही. संपूर्ण शहराला गल्ली बाजाराचे स्वरूप आले आहे."
"मला माझी जुनी मेकॅनिकची नोकरी परत द्या"रणदीप सुरजेवाला म्हणाले, "या शहरात माझ्या आणि तुमच्या मुलांना राहायचे आहे. तुम्हाला आणि मला मिळून हे शहर चालवायचे आहे. मी तुम्हाला सांगायला आलो आहे की, प्रत्येक घरात एक जुना मेकॅनिक आहे, मी या शहराचा जुना मेकॅनिक आहे. घराची तार खराब झाली किंवा फ्यूज उडाला की जुन्या मेकॅनिकला बोलवतात. मी या शहराचा जुना मेकॅनिक आहे, मी स्वतःच्या हातांनी हे शहर मंदिरासारखं बांधलं आहे, म्हणून मी तुम्हाला आवाहन करायला आलो आहे. कृपया मला मेकॅनिकची जुनी नोकरी परत द्या, जेणेकरून मी शहरात मेकॅनिक म्हणून माझे काम करू शकेन."