यंदाच्या लोकसभा निवडणुकीत देशातील अनेक राज्यांमध्ये अटीतटीच्या लढती झाल्याने सत्तांतराबाबत इंडिया आघाडीतील घटक पक्ष आणि नेत्यांना असलेल्या अपेक्षा वाढल्या आहे. दरम्यान, काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी लोकसभा निवडणुकीत इंडिया आघाडीला स्पष्ट बहुमत मिळालं तर केवळ ४८ तासांच्या आत नव्या पंतप्रधानांची निवड केली जाईल, असं विधान केलं आहे. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यातील प्रचाराच्या अखेरच्या दिवशी दिसेल्या मुलाखतीमध्ये जयराम रमेश यांनी इंडिया आघाडीला २७२ पेक्षा अधिक जागा मिळतील असा विश्वास व्यक्त केला.
दरम्यान, इंडिया आघाडीचं सरकार स्थापन झालं तर सध्या एनडीएमध्ये असलेले पक्षही इंडिया आघाडीत दाखल होतील, असा दावा जयराम रमेश यांनी केला आहे. मात्र या पक्षांना आघाडीत घ्यायचं की नाही, याबाबतचा अंतिम निर्णय काँग्रेसचे हायकमांड घेतील.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीनंतर नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू यांच्यासारख्या एनडीएमधील नेत्यांना इंडिया आघाडीचे दरवाजे उघडे असतील का, असं विचारलं असता जयराम रमेश म्हणाले की, नितीश कुमार हे पलटी मारण्यात पटाईत आहेत. तर चंद्राबाबू नायडू हे २०१९ मध्ये काँग्रेससोबत होते. इंडिया आणि एनडीए आघाडीमध्ये दोन आयचं अंतर आहे. त्यातील एक आय म्हणजे इंसानियत आणि दुसरा आय म्हणजे इमानदारी. ज्या पक्षांच्या मनात इमानदारी आणि इन्सानियत आहे, मात्र जे पक्ष एनडीएमध्ये आहेत, ते इंडिया आघाडीमध्ये सहभागी होऊ शकतात. तसेच जनतेचा कौल मिळाल्यानंतर सत्तेवर येणारं सरकार हे हुकूमशाह नाही, तर जनतेचं सरकार असेल.