नवी दिल्ली – पंजाब काँग्रेस अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांचं पुन्हा एकदा पाकिस्तान प्रेम उफाळून आलं आहे. भारत-पाकिस्तान यांच्यात व्यापारी संबंध सुरु व्हायला हवेत असं सिद्धूनं म्हटलं आहे. दोन्ही देशांमध्ये बॉर्डर बंद असल्या कारणानं पंजाबला मागील ३४ महिन्यात जवळपास ४ हजार कोटींचे नुकसान झालं आहे. १५ हजार नोकऱ्या गेल्या आहेत असं नवज्योत सिद्धू यांनी सांगितले.
नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले की, जर भारत-पाकिस्तान या दोन्ही देशात व्यापार सुरु झाला तर देश आणि पंजाबचा ६ महिन्यात ६० वर्षाचा विकास होईल हा माझा दावा आहे. त्यामुळे ही परिस्थिती चांगली होईल. तुम्ही कराची ते मुंबई उघडलं आहे मग अमृतसर ते लाहौर का नाही? २७५ हजार कोटींचं क्षेत्र आहे. जवळपास ३७ बिलियन अमेरिकी डॉलर हा व्यापार आहे. आम्ही फक्त १० बिलियन अमेरिकी डॉलरचा व्यापार करतो. ५ टक्केही त्याचा वापर केला नाही. मागील ३४ महिन्यात ४ हजार कोटींचे पंजाबचं नुकसान झालं आहे. तर १५ हजार नोकऱ्या गेल्या. कायदा सुव्यवस्था जाऊद्या, या निवडणुकीत सर्वात मोठा मुद्दा रोजगाराचा आहे असं सिद्धू यांनी सांगितले.
याआधीही करतारपूर साहिब कॉरिडोर पुन्हा उघडण्यासाठी नवज्योत सिंग सिद्धू यांनी पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान माझा मोठा भाऊ असल्याचं म्हटलं होतं. करतारपूर दर्शनासाठी पोहचलेल्या सिद्धूचं त्याठिकाणच्या पाकिस्तानी शिष्टमंडळानी फूलांनी स्वागत केले होते. करतारपूर सीईओने पंतप्रधान इमरान खान यांच्या वतीने तुमचं स्वागत करतो असं म्हटलं त्यावर सिद्धूने इमरान खान माझा मोठा भाऊ आहे. त्याने मला खूप प्रेम दिलं असं विधान केले होते.
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनीही केली होती टीका
कॅप्टन अमरिंदर सिंग यांनी पंजाबच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिल्यानंतर नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर गंभीर आरोप केले होते. सिद्धू काहीही सांभाळू शकत नाहीत, मी त्यांना चांगलंच ओळखतो, ते राज्यासाठी धोकादायक ठरतील. सिद्धूला जर पंबाजच्या मुख्यमंत्रीपदाचा चेहरा बनवला, तर त्यास माझा विरोध राहिल. कारण, हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा आहे, पाकिस्तानसोबत नवज्योत यांचे संबंध आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान यांची सिद्धूशी खास मैत्री आहे, तर जनरल बाजवाही सिद्धूचे मित्र आहेत असं कॅप्टन यांनी म्हटलं होतं.