हिंमत असेल तर मोदींनी लोकसभेत येऊन माझ्या प्रश्नांची उत्तरे द्यावीत; राहुल गांधी यांचे थेट आव्हान
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 05:45 AM2019-01-03T05:45:02+5:302019-01-03T08:46:36+5:30
हवाई दलाला १२६ विमाने हवी असताना केवळ ३६ विमानांचाच सौदा का केला? विमानांची संख्या कमी का केली? एकूण ५२६ कोटी रुपयांचा हा व्यवहार १,६00 कोटी रुपयांवर का गेला?
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात हिंमत असेल, तर त्यांनी राफेल विमान खरेदीबाबत मी विचारत असलेल्या प्रश्नांची लोकसभेत येऊ न उत्तरे द्यावीत, असे माझे त्यांना आव्हान आहे, पण त्यांच्यात ती हिंमतच नाही, अशी टीका करीत काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांनी बुधवारी लोकसभेत या व्यवहारावरून मोदींवर टीकास्त्रच सोडले.
हवाई दलाला १२६ विमाने हवी असताना केवळ ३६ विमानांचाच सौदा का केला? विमानांची संख्या कमी का केली? एकूण ५२६ कोटी रुपयांचा हा व्यवहार १,६00 कोटी रुपयांवर का गेला? हिंदुस्थान एरोनॉटिक्स या सरकारी व अनुभवी कंपनीऐवजी अनिल अंबानी यांच्या अनुभव नसलेल्या कंपनीला आॅफसेट कंत्राट देण्यास नेमका कोणाला रस होता? दसॉल्ट कंपनीच्या पैशातूनच अनिल अंबानी यांनी आपल्या कंपनीसाठी जमीन खरेदी केली, हे खरे नाही का? असे एका पाठोपाठ सणसणीत प्रश्न करीत राहुल गांधी यांनी या प्रकरणाची संसदेच्या संयुक्त समितीतर्फे चौकशी करावी, अशी मागणी केली.
संसदेच्या समितीने चौकशी केली, तरच या प्रकरणातील भ्रष्टाचार उघड होईल, असे सांगून राहुल गांधी यांनी इथे डाळीत काळेबेरे नसून, सारी डाळच काळी असल्याचा टोला मोदी यांना लगावला. सरकारने १५00 कोटी रुपयांचा व्यवहार करण्याचे ठरविले, तेव्हा संरक्षण खात्याच्या अधिकाऱ्यांनी आक्षेप घेतला होता, हे खरे नाही काय आणि पंतप्रधानांनी अशा व्यवहारात लक्ष घालू नये, असे नोटिंग या अधिकाºयांनी फायलीवर केले होते, हे खरे नाही की काय, असे सवालही राहुल गांधी यांनी केले. मात्र सर्वोच्च न्यायालयाने या व्यवहारात गैरव्यवहार झालेला नाही, असे नमूद केले असल्याने या प्रकरणाची संसदीय समितीतर्फे चौकशी करण्याचे कारण नाही, असे सांगून अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राहहुल गांधी यांची मागणी फेटाळून लावली.
राफेलविषयीच्या फायली आपल्या घरी असल्याचेगोव्याचे मुख्यमंत्री व माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आपणास सांगितल्याचे तेथील आरोग्यमंत्री विश्वजीत राणे अन्य एकाला सांगत असल्याची ध्वनिफित काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी लोकसभेतील चर्चेआधीच पत्रकार परिषदेत सर्वांना ऐकवली होती. त्याचा उल्लेख करून, ती ध्वनिफित ऐकवण्याचा प्रयत्न राहुल गांधी यांनी केला. पण त्यास लोकसभाध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी परवानगी नाकारली.
विरोधकांच्या प्रश्नांना उत्तरे देण्यास पंतप्रधान तर तयार नाहीतच, पण लोकसभेतील एकही मंत्री वा भाजपाचा सदस्य सक्षम नाही, त्यामुळे राज्यसभेतील अरुण जेटली यांना उत्तर देण्यास बोलावण्यात आले, याबद्दलही विरोधकांनी आक्षेप घेतला.
राफेल प्रकरणातील ध्वनिफित बोगस आहे, असे सांगून जेटली यांनी राहुल गांधी यांना लढाऊ विमाने म्हणजे काय हे कळतच नाही, गांधी घराण्याला फक्त पैसा कोठून मिळेल, यातच रस असतो, त्यांना देशाच्या सुरक्षिततेची काळजी नाही, असे सांगून अर्थमंत्री म्हणाले की, मोदी सरकारने खरेदी केलेली विमाने यूपीए सरकारच्या सौद्यापेक्षा ९ टक्के स्वस्त आणि अधिक सुसज्ज आहेत. काँग्रेस खोटेनाटे आरोप करून निष्कारण संसदीय समितीची मागणी करीत आहे, अशी टीकाही त्यांनी केली.
‘डबल ए’ असा उल्लेख
अनिल अंबानी सभागृहाचे सदस्य नसल्याने त्यांचे नाव घेता येणार नाही, असे लोकसभाध्यक्षांनी सांगितले, तेव्हा राहुल गांधी यांनी ‘डबल ए’ असा त्यांचा उल्लेख केला. अंबानी यांच्या कंपनीसाठी मोदी यांनी दबाव आणला होता, या फ्रान्सचे राष्ट्रपती ओलांद यांच्या वक्तव्याचाही राहुल गांधी उल्लेख केला.
माजी संरक्षणमंत्री..!
गोव्याचे मुख्यमंत्री असा उल्लेख न करण्याच्या सूचना त्यांनी राहुल यांना दिल्या. त्यावर राहुल यांनी माजी संरक्षणमंत्री असाच उल्लेख केला.
काँग्रेसने का केला नाही व्यवहार?
अरुण जेटली यांनी चर्चेला उत्तर देताना संसदीय समितीची गरजच नाही, बोफोर्स प्रकरणातही संसदीय समितीच्या चौकशीतून काहीच बाहेर आले नव्हते. या प्रकरणात तर सर्वोच्च न्यायालयाने क्लीन चिट दिली आहे, असे सांगितले. अनेक प्रश्नांची उत्तरे थेट देण्याऐवजी त्यांनी राहुल गांधी हे बोफोर्समधील क्वात्रोच्ची यांच्या मांडीवर खेळत होते, असे सांगत गांधी घराण्यावर हल्ला चढविला. काँग्रेसने आपल्या काळात राफेलचा सौदा का केला नाही, असा सवालही त्यांनी केला.
शिवसेनाही पडली तुटून
शिवसेनेच्या अरविंद सावंत यांनीही गांधी यांच्या सुरात सूर मिसळून राफेल खरेदीची संसदीय समितीतर्फे चौकशी व्हावी, अशी मागणी केली. यात काही घोटाळा झालेला नाही, तर चौकशीला सरकार का तयार नाही, असा सवालही त्यांनी केला.
विरोधकांचीही साथ
राहुल गांधी हे मोदी व केंद्र सरकारवर टीकास्त्र चढवत असताना अन्य विरोधकांचीही त्यांना साथ मिळाली. तृणमूलचे सौगत रॉय, बिजू जनता दलाचे कलकेश नारायण देव, तेलगू देसमचे जयदेव भल्ला यांनीही राहुल यांच्याप्रमाणे विमानांची कमी केलेली संख्या, वाढलेली किंमत आणि एकूणच अपारदर्शक प्रक्रिया यावरून सरकारवर जोरदार हल्ला चढविला.