नवी दिल्ली : मलेशियन एअरलाईन्सचे एमएच १७ हे विमान गुरुवारी रात्री युक्रेनच्या हद्दीत पाडण्यात आले. त्यामागेच अवघे २५ ते ५० नॉटिकल मैल(४० ते ८० कि.मी.) अंतरावर एअर इंडियाचे १२६ प्रवासी असलेले विमान होते. अंतराचा हा फरक केवळ पाच मिनिटांचा होता. सिंगापूर एअरलाईन्सचे एक विमानही त्याच अंतरावर होते. नशीब बलवत्तर म्हणून ही दोन्ही विमाने बचावली, अशी माहिती समोर आली आहे.एअर इंडियाचे एआय ११३ हे विमानच बर्मिंघमहून दिल्लीला जात होते तर सिंगापूर एअरलाईन्सचे कोपनहेगनहून निघाले होते. ही दोन्ही विमाने युक्रेनमध्ये अतिरेक्यांनी पाडलेल्या मलेशियन बोर्इंग ७७७ या विमानापासून अवघ्या पाच मिनिटांच्या अंतरावर होती. दरम्यान एअर इंडियाच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने मात्र एआय ११३ या विमानाचा मार्ग वेगळा राहिला असता असा खुलासा केला आहे. युक्रेनमध्ये संघर्ष उद्भवल्यापासून या भागातून विमाने न नेण्याचा आदेश एअर इंडियाचे संचालक(आॅपरेशन्स) एसपीएस पुरी यांनी दिले होता. युक्रेनचा भाग युद्धग्रस्त मानण्यात आल्याने हा आदेश होता. मात्र आता अतिरेक्यांनी केलेल्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर हा मार्ग पूर्णपणे टाळला जाईल, असेही हा अधिकारी म्हणाला. प. युरोप आणि आग्नेय आशिया यांच्यातील सरळ मार्ग म्हणून युक्रेनमधून उड्डाणे केली जात होती. अनेक एअरलाईन्सने युक्रेनमधील संघर्षाच्या काळातही याच मार्गाचा वापर कायम ठेवला होता. (लोकमत न्यूज नेटवर्क)
पाच मिनिटे उशीर झाला असता तर...
By admin | Published: July 18, 2014 11:13 PM