अहमदाबाद, दि. 14 - आजचा दिवस ऐतिहासिक आहे. भारत-जपानमध्ये नव्या अध्यायाची सुरुवात होत आहे असे पंतप्रधान शिंजो अबे बुलेट ट्रेन प्रकल्पाचे भूमिपूजन सोहळयात बोलताना म्हणाले. दहावर्षापूर्वी मला भारतीय संसदेत भाषणाची संधी मिळाली होती अशी आठवण अबेनीं यावेळी सांगितली. जगातील अन्य कुठल्याही द्विपक्षीयसंबंधांपेक्षा भारत आणि जपानचे द्विपक्षीय संबंध अधिक दृढ आणि समृद्ध आहेत असे अबे म्हणाले.
शक्तीशाली जपान भारताच्या तर, शक्तीशाली भारतामध्ये जपानचे हित आहे असे मोदी म्हणाले. दुस-या महायुद्धानंतर जपानची वाताहात झाली होती. पण 1964 साली जपानमध्ये बुलेट ट्रेनचा आरंभ झाला आणि ख-या अर्थाने विकासाची सुरुवात झाली. नव्या जपानचा पूर्नजन्म झाला असे शिंजो अबे म्हणाले. बुलेट ट्रेनमुळे अनेक शहरे जवळ आली आणि कंपन्यांना व्यवसाय वाढीसाठी फायदा झाला असे अबेंनी सांगितले.
भारताच्या मेक इन इंडिया कार्यक्रमासाठी जपान प्रतिबद्ध आहे. माझे प्रिय मित्र मोदी जागतिक आणि दूरदृष्टी असलेले नेते आहेत अशा शब्दात अबे यांनी मोदींचे कौतुक केले. बुलेट ट्रेनसाठी 100 पेक्षा जास्त जपानी इंजिनिअर भारतात दाखल झाले आहेत. भारत आणि जपानी इंजिनिअर एकत्र मिळून काम करत आहेत. जपानच्या तंत्रज्ञानाला भारताच्या मनुष्यबळाची साथ मिळाली तर, भारताचा जगाचा कारखाना बनू शकतो असे अबे यांनी सांगितले.
हिंद महासागर क्षेत्रातील आपण महत्वाचे भागीदार असून, भारत आणि जपानमध्ये फक्त द्विपक्षीयच नव्हे तर, रणनितीक आणि जागतिक भागीदार आहेत असे अबे म्हणाले. जपानमध्ये बुलेट ट्रेन सेवा सुरु झाल्यापासून एकही अपघात झालेला नाही. हे शून्य अपघाताचे तंत्रज्ञान आम्ही भारतालाही शिकवू असे अबे म्हणाले. जपानचा पहिला ज आणि इंडियाचा पहिला इ मिळवला तर जइ म्हणजे विजय शब्द तयार होतो असे त्यांनी सांगितले. पुढच्यावेळी भारतात येईन तेव्हा मोदींबरोबर बुलेट ट्रेनमधून प्रवास करण्याची इच्छा आहे असे अभे म्हणाले.