ऑनलाइन लोकमत
चेन्नई, दि. 27 - आयकर विभागाने घरावर धाड टाकल्यानंतर पदावरुन हटवण्यात आलेले तामिळनाडूचे सचिव पी रामा मोहन राव यांनी केंद्र आणि राज्य सरकारविरोधात भूमिका घेतली आहे. 'टाकण्यात आलेली धाड ही घटनेविरोधात जाऊन करण्यात आलेला अत्याचार असल्याचं', त्यांनी म्हटलं आहे. 'केंद्र सरकार राज्य प्रशासनाचा काही आदर करत नाही. राज्य सरकार आहे कुठे ?', असा सवालही त्यांनी विचारला आहे.
आपल्या बदलीचा निषेध करत बोलताना 'या राज्य सरकारमध्ये मला बदलीची ऑर्डर देण्याची हिंमत नाही. मला अजूनपर्यंत अशी कोणतीच ऑर्डर मिळालेली नाही', असं म्हटलं आहे. 'मी अजूनही सचिव असून माझी नियुक्ती जयललितांनी केली होती', असं सांगत आपण कोणत्याही दबावाखाली झुकणार नसल्याचं सांगितलं आहे. माझ्यामुळे राज्यात भूकंप येऊ शकतो. माजी मुख्यमंत्री जयललिता जिवंत असत्या तर ही धाड टाकण्याची हिंमत झाली असती का ? असा सवाल पी रामा मोहन राव यांनी विचारला आहे.
I am being targeted; I have fear, my life is in danger: Former TN Chief Secy P Rama Mohana Rao pic.twitter.com/MprtDcIfk8— ANI (@ANI_news) 27 December 2016
'जयललितांच्या अनुपस्थितीत राज्यात काहीच सुरक्षित नाही आहे. जर माझ्यासोबत असं होऊ शकतं, तर मग अण्णाद्रुमूकच्या बाकीच्या शिलेदारांचं काय होणार ?', असंही ते बोलले आहेत. 'जर आयकर विभागाला मुख्य सचिवांच्या घरावर धाड टाकायची होती तर त्यांनी राज्य सरकारला प्रथम पदावरुन हटवण्य़ास सांगणं गरजेचं आहे. धाड टाकण्याआधी मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेतलं गेलं पाहिजे. पण मुख्यमंत्र्यांना विश्वासात घेण्यात आलं होतं की नव्हतं माहिती नाही', असं सांगितलं आहे. माझा अडथळा होत असल्याने माझ्यावर कारवाई केल्याचा आरोप त्यांनी केला आहे.