फिरोजबाद : महिलांसोबत होणाऱ्या लैंगिक शोषणाच्या घटनांविरोधात देशभर सुरू असलेल्या 'मीटू' मोहिमेने जोर धरला आहे. 'मीटू' मोहिमेअंतर्गत रोज नव-नवे आरोप होत असल्याने सर्वांनाच धडकी भरली आहे. दरम्यान, यावरुन आता खासदार अमर सिंह यांनी विधान केले आहे. बॉलिवूड अभिनेत्री जयाप्रदा यांना सुद्धा काही लोकांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांनी 'मीटू' मोहिमेच्या अंतर्गत आवाज उठवला तर समाजवादी पक्षाचे नेते आझम खान यांच्यासारखे लोक जेलमध्ये जातील, असे अमर सिंह यांनी म्हटले आहे.
अमर सिंह यांना 'मीटू' मोहिमेसंदर्भात पत्रकारांनी विचारले असता ते म्हणाले, महिलांचा सन्मान न करणाऱ्या मोदी सरकारला फटका बसणार आहे. सरकारमधील अनेक मंत्र्यांना शिक्षा होणार आहे. तसेच, बॉलिवूड अभिनेत्री जयाप्रदा यांना सुद्धा काही लोकांचा सामना करावा लागला आहे. त्यामुळे त्यांनी 'मीटू' मोहिमेच्या अंतर्गत आवाज उठवला तर आझम खान यांच्यासारखे लोक जेलमध्ये जातील. याचबरोबर, या प्रकरणाचा व्यवस्थितरित्या तपास झाला पाहिजे. कारण, मला सुद्धा या प्रकरणात कोणीही अडकवू शकतो.
विशेष म्हणजे 'मीटू'वरुन अमर सिंह यांनी ऋषीमुनी आणि देवांना सुद्घा सोडले नाही. ते म्हणाले, जेव्हा विश्वामित्र तपश्चर्या करत होते, त्यावेळी इंद्राने त्यांची तपश्चर्या भंग करण्यासाठई मेनकाला पाठविले होते. त्यामुळे पुराणात लिहिलेले सत्य मानले तर विश्वामित्र यांना सुद्धा 'मीटू'चा फटका बसला होता.