लोकमत न्यूज नेटवर्कसुरेंद्रनगर : ‘भाई अमे केजरीवाल ना व्हिडीओ नो नुसतो डीपी लगाड्यो तो भाजपने पसिनो छूट्यो, रातमरात बैठक बोलायी अने अमारो पगार वधायो...’ सुरेंद्रनगर जिल्हाधिकारी कार्यालयाशेजारी रंगलेली पोलिसांची ही चर्चा गुजरातच्या राजकारणाबाबत खूप काही सांगणारी ठरली आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयासमोर चहाच्या टपरीवर काही पोलिसांचा घोळका चहाचा आनंद घेत गप्पांच्या मस्तीत रंगला होता. त्याच वेळी एका पोलिस मित्रासाेबत त्यांची चर्चा रंगली. त्याने पोलिसांना मिश्कीलपणे ‘चांगली ड्युटी करा...’ असा सल्ला दिला. त्यावर एका पोलिसानेही मिश्कीलपणे उत्तर देत केजरीवालचा व्हिडीओ लावताच कसा घाम फुटला, असे बोलून भाजपचा त्या कार्यकर्त्याची खोडी काढली आणि गप्पांच्या ओघात एका पाेलिसाने हा किस्सा सांगितला. तो म्हणाला, आम आदमी पार्टीचे प्रमुख व दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ‘गुजरातमध्ये आम आदमी पार्टीचे सरकार येताच पोलिसांचा वेतनश्रेणीचा प्रश्न सोडवू...’ असे आश्वासन दिले होते. तो व्हिडीओ अनेक पोलिसांनी आपल्या डीपीवर ठेवला होता. त्याचा परिणाम असा झाला की सरकारने तत्काळ पोलिसांचा पगार साडेचार ते पाच हजारांनी वाढविला. त्यातूनच ही मिश्किल चर्चा झाल्याचे ताे म्हणाला.