ऑनलाइन लोकमत -
रोहतक, दि. ४ - 'कायद्याने हात बांधले आहेत नाहीतर भारत माता की जय बोलण्यास नकार देणा-या हजारो, लाखो लोकांची मुंडकी छाटली असती', असं वादग्रस्त वक्तव्य योगगुरु बाबा रामदेव यांनी केलं आहे. बाबा रामदेव यांनी भारत माता की जय बोलण्यास नकार देणा-या असदुद्दीन ओवेसींचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
'जर कोणी मुंडकं छाटलं तरी भारत माता की जय बोलणार नाही असं म्हणत असेल, तर मला त्यांना सांगायचं आहे की आम्ही कायद्याचा आणि संविधानाचा आदर करतो अन्यथा हजारो, लाखो मुंडकी आम्ही छाटू शकतो', असं वक्तव्य बाबा रामदेव यांनी केलं आहे. 'अशाप्रकारे बोलण्याची लोकांना लाज वाटायला हवी. आपल्या मातृभुमीचा आदर करावा', असंदेखील बाबा रामदेव बोलले आहेत.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 'भारत माता की जय बोलण्यास नकार देणा-यांना देशात राहण्याचा हक्क नसल्याचं' केलेल्या वक्तव्यावरुनदेखील वाद निर्माण झाला होता. मात्र माध्यमांनी सोयीस्करपणे केवळ ‘भारतमाता की जय’बाबतचा काही भाग उचलून वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला असल्याचं स्पष्टीकरण मुख्यमंत्र्यांनी दिलं होतं.
'मी भारत माता की जय अशी घोषणा देणार नाही', असं वक्तव्य ऑल इंडिया मजलीस इत्तेहदुअल मुस्लिमीनचे (एमआयएम) अध्यक्ष तथा हैदराबादचे खासदार असदुद्दीन ओवेसी यांनी लातूरच्या उदगीरमधील रॅलीमध्ये केलं होतं. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांनी मुलांना भारत माता की जय घोषणा देण्यास शिकवावं लागेल असं म्हटलं होत, त्यावर टीका करत असदुद्दीन ओवेसी यांनी हे वक्तव्य केलं होतं.