- मधुकर भावे
(ज्येष्ठ पत्रकार)१९७७ च्या पराभवानंतर इंदिरा गांधी नागपूरला आल्या. पत्रकारांना म्हणाल्या होत्या.. ‘हारे तो क्या हुआ, फिर जीत जाऐंगे’.३९ वर्षांपूर्वी इंदिराजींनी नागपुरात दिलेला हाच मंत्र काँग्रेसला आज उपयोगी पडणारा आहे.इंदिरा गांधी यांचा वयाच्या चौथ्या वर्षापासून ३१ आॅक्टोबर १९८४ रोजी रक्त सांडेपर्यंत देशाशी संबंध होता. त्यांनी काँग्रेससाठी वानरसेना स्थापन केली ती १२ व्या वर्षी. त्यामुळे काँग्रेसच्या १३२ वर्षांच्या इतिहासात इंदिराजींचे स्थान अनन्यसाधारण आहे. जन्मशताब्दी वर्षात काँग्रेसने देशात व राज्यात जन्मशताब्दी वर्ष ज्या तडफेने साजरे करायला हवे होते तसे केले नाही.काँग्रेसचा, इंदिराजींचा व संजय गांधींचा १९७७ साली पराभव झाला. पण इंदिराजी रस्त्यावर उतरल्या. नागपूरला आल्या. जवाहरलाल दर्डा (बाबूजी) यांच्या घरीच त्या थांबल्या. तेथूनच त्या पवनारला विनोबा भावे यांना भेटायला गेल्या. तिथे पत्रकारांनी घेरून, पराभवाबद्दल विचारले, तेव्हा त्या म्हणाल्या, ‘हारे तो क्या हुआ, फिर जीत जाऐंगे’...इंदिराजींच्या त्या वाक्यानंतर १९८० च्या निवडणुकीत जनता पक्षाचा धुव्वा उडाला व इंदिराजी पुन्हा पंतप्रधान झाल्या. या घटनेचा संदर्भ दोन कारणांनी देतो. ज्या ‘लोकमत’ने इंदिराजी जन्मशताब्दीनिमित्त या अंकाचे आयोजन केले आहे त्या लोकमतचा काँग्रेस सत्तेवर पुन्हा येण्यात मोठा सहभाग होता. १० जानेवारी १९७८ रोजी शिवाजी पार्कवरील सभेत त्या म्हणाल्या, ‘विदर्भ मे मैं लोकमत के हथियार से मै लड रहीं हू’. नागपूरच्या कस्तुरचंद पार्कवर २३ जानेवारी १९७८ रोजी सभेत इंदिराजींनी ‘फिर जीत जाऐंगे’, असा दावा केला होता.काँग्रेसला ३७ वर्षांनंतर हाच मंत्र उपयोगी पडेल. कस्तुरचंद पार्कच्या सभेत त्या म्हणाल्या की, गरिबांचा आवाज दडपला गेला म्हणून मी रस्त्यावर उतरले. आज तर गरिबांनाच दडपणे सुरू आहे. १९८० च्या निवडणुकांत काँग्रेसच्या भूमिका ठरवायला इंदिराजींनी जवाहरलाल दर्डा यांना बोलावले. त्यांच्यासोबत जाण्याची संधी मला मिळाली. इंदिराजींची मुलाखत झाली. त्यानंतर जनता राजवटीच्या विरोधात एक पोस्टर सर्व भाषेत प्रसिद्ध झाले. ते पोस्टर लोकमतने तयार केले होते. इंदिराजींच्या १९८० च्या यशात लोकमतचे असे योगदान होते. आज नेमकी तीच स्थिती आहे. काँग्रेसला पुरोगामी विचार घेऊन एक मोठी लढाई लढावी लागेल. २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेसची मोठी घसरण झाली. पण देशाच्या उभारणीत काँगे्रस आणि इंदिराजी यांचा मोठा वाटा आहे.- ५० वर्षांत काँग्रेसने काय केले असे विचारले जाते. या देशाला एक ठेवण्याचे काम काँग्रेसनेच केलेले आहे. महात्मा गांधी, इंदिरा गांधी आणि राजीव गांधी यांची बलिदाने वाया जाणार नाहीत. यासाठी इंदिराजींची जिद्द, हिंमत काँग्रेसला पुन्हा एकदा यशाकडे घेऊन जाऊ शकेल.तोच मंत्र आताही तारेल१९८४ मध्ये लोकसभेच्या ४१५ जागा जिंकण्याचा विक्रम करणाºया काँग्रेसला २०१४ साली ४४ जागा मिळाल्या. त्यामुळे आता पुन्हा काँग्रेसला राखेतून उभं राहावं लागेल. देशात आणि महाराष्टÑातही. हे फार अशक्य नाही. इंदिराजींनी चमत्कार करून दाखवला. आता लोक चमत्कार करतील. जातीयवाद व धर्मवादाच्या उदात्तीकरणा- विरोधात उभं राहावं लागेल. १९७७ साली लढाई हरलेल्या काँग्रेसने १९८० साली लढाई जिंकली होती. ‘हारे तो क्या हुआ, फिर जीत जाऐंगे’ हा इंदिराजींचा मंत्रच काँग्रेसला तारेल.