OP Rajbhar Maharashtra Election 2024 : महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने हालचाली सुरू आहेत. सत्तेत असलेल्या महायुतीमध्ये जागावाटप करण्यावर जोर दिला जात असताना, आता उत्तर प्रदेशातील ओपी राजभर यांच्या पक्षाने स्वबळाचा इशारा दिला आहे. पंचायत राज मंत्री ओमप्रकाश राजभर म्हणाले की, "बिहार आणि महाराष्ट्रात आम्हाला जागा दिल्या नाही, तर आमचा पक्ष स्वबळावर निवडणूक लढवेन."
सुहेलदेव भारतीय समाज पार्टीचे नेते ओमप्रकाश राजभर यांनी जहुराबाद गाजीपूर विधानसभा मतदारसंघातील नसरतपूरमध्ये महाराजा सुहेलदेव यांच्या पुतळ्याचे अनावरण केले. कार्यक्रमानंतर त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
एनडीएनने जागा दिल्या नाही, तर महाराष्ट्रात स्वबळावर लढवू
ओमप्रकाश राजभर म्हणाले, "आमच्या सुहेलदेव भारतीय समाज पार्टीला महाराष्ट्र आणि बिहारमध्ये एनडीएने जागा दिल्या नाही, तर आम्ही स्वबळावर निवडणूक लढवू. बिहारमध्ये ३६ जिल्ह्यांत आमची तयारी आहे. तर महाराष्ट्रातील मुंबईमध्ये २२ जागांवर आम्ही निवडणूक लढवण्याची तयारी करत आहोत, जिथे उत्तर भारतीयांचा प्रभाव जास्त आहे", असे राजभर यांनी सांगितले.
जातीनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावर बोलताना राजभर म्हणाले, "जातीनिहाय जनगणना व्हायला पाहिजे. जे काम समाजवादी पार्टी, काँग्रेस आणि बसपा करू शकले नाही, ते काम मोदींनी केले. जातीनिहाय जनगणना करण्याचे कामही ते करतील. मी २२ वर्षांपासून जातीनिहाय जनगणना करण्याची मागणी करतोय", असे ते म्हणाले.