ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. २७ - डेहराडूनमध्ये राजकीय आंदोलनाच्यावेळी शक्तीमान या पोलिसांच्या घोडयाला झालेल्या अमानुष मारहाणीचे दृश्य पाहून अनेकांना दु:ख झाले होते. दिल्लीमध्ये एक अज्ञात व्यक्ती भटक्या कुत्र्यांवर हल्ला करुन त्यांची हत्या करत असल्याचे दृश्य कॅमे-यात कैद झाले होते.
बंगळुरुमध्ये एका गृहिणीने कुत्र्याच्या आठ पिल्लांची दगडावर आपटून हत्या केली. आग्र्यामध्ये एक श्वान अंगावर भुंकला म्हणून एका अज्ञात व्यक्तीने त्या श्वान आणि त्याच्या पाच पिल्लावर अॅसिड हल्ला केला. या सर्व घटना या महिनाभरातील आहेत.
माणसांविरोधातील गुन्ह्याची तीव्रता वाढली त्याचे स्वरुप विकृत झाल्यानंतर कायद्यामध्ये आवश्यक बदल झाले. पण या मुक्या प्राण्यांवर माणसाकडून होणारे हल्ले दिवसेंदिवस गंभीर होत असताना कायद्यामध्ये मात्र त्याप्रमाणे बदल झालेले नाहीत.
१५ मार्चला कुत्र्याच्या आठ पिल्लांची हत्या करणा-या गृहिणीला पोलिसांनी अटक केली पण नंतर तिची जामिनावर सहज सुटका झाली. तसेच शक्तीमान घोडयाला मारहाण करणारा भाजप आमदार गणेश जोशीवर कठोर कारवाई करण्याची देशभरातून मागणी झाली. पण त्याचीही जामिनावर सहज सुटका झाली.
प्राण्यांच्या संरक्षणासाठी कठोर कायदे नसल्याने या सर्वांची सहज सुटका झाली. प्राण्यांविरोधातील क्रूरतेला प्रतिबंध करणा-या १९६० च्या कायद्यानुसार पहिल्या गुन्ह्यासाठी ५० रुपये दंडाची तरतुद आहे. पहिला गुन्हा केल्यानंतर तीनवर्षात पुन्हा तसाच गुन्हा केला तर जास्तीत जास्त दंड १०० रुपये किंवा तीन महिने तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतुद आहे.
भारताच्या तुलनेत पाश्चिमात्य देशांमध्ये प्राण्यांविरोधातील गुन्ह्यांसाठी कठोर शिक्षेची तरतूद आहे. पाचवर्षांचा कारावासा आणि ५० हजार किंवा त्यापेक्षा जास्त डॉलर्सचा दंड अशा शिक्षा आहेत. प्राण्यांवर हात उगारणा-या, हल्ला करणा-यांना रोखण्यासाठी भारतात कायद्यात बदल करुन कठोर शिक्षेची तरतूद आवश्यक आहे असे प्राण्यांसाठी काम करणा-या विविध स्वयंसेवी संस्थांचे मत आहे.