नवी दिल्ली : नवज्योतसिंग सिद्धू यांना सरकारमध्ये मंत्री म्हणून नेमून दिलेले काम करायची इच्छा नसेल, तर मी काही करू शकत नाही, असा गर्भित टोला पंजाबचे मुख्यमंत्री कॅ. अमरेंद्रसिंग यांनी सोमवारी मारला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटण्यासाठी कॅ. अमरेंद्रसिंग संसद भवनात आले होते. त्यावेळी पत्रकारांनी सिद्धू यांच्या राजीनाम्याविषयी मुख्यमंत्र्यांना सवाल केले.सिद्धू यांनी १० जुलै रोजी काँग्रेस अध्यक्षांना उद्देशून दिलेला एक ओळीचा राजीनामा रविवारी टिष्ट्वटरवर प्रसिद्ध केला होता. मात्र राजीनामा मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहायला हवा, हे लक्षात आल्यावर आता त्यांनी मुख्यमंत्र्यांना उद्देशून लिहिलेले रीतसर राजीनाम्याचे पत्र त्यांच्या निवासस्थानी पोहोचविले आहे. त्याचा संदर्भ देत, पण राजीनामा स्वीकारणार की नाही, हे स्पष्ट न करता मुख्यमंत्री म्हणाले, आधी मला तो राजीनामा वाचावा लागेल. सिद्धू यांनी काँग्रेस अध्यक्षांना उद्देशून राजीनामा लिहिण्यातही काही गैर नव्हते. कारण मंत्रिमंडळाची रचना काँग्रेस श्रेष्ठींच्या सल्ल्यानेच झाली होती. शिवाय राहुल गांधी अजूनही पक्षात सक्रिय आहेतच, असेही अमरेंद्रसिंग म्हणाले.मोदींच्या भेटीबद्दल ते म्हणाले की, पुन्हा पंतप्रधान झाल्यानंतर भेटलो नव्हतो म्हणून सदिच्छा भेट घेतली. शिवाय गुरू नानकदेव यांच्या त्रिशताब्दी जन्मोत्सवाचेही त्यांना निमंत्रण दिले.>जनरलच्या आदेशाला सैनिकाचा नकार कसा?सरकार चालवायचे म्हणजे काही किमान शिस्त पाळणे जरूरीचे आहे. मला अमुकच खाते द्या, असे कोणताही मंत्री म्हणू शकत नाही. पूर्वी लष्करात असलेल्या कॅप्टन अमरेंद्रसिंग यांनी त्याच थाटात सवाल केला की. जनरलने आदेश दिल्यावर सैनिक नाही कसे म्हणू शकतो?
मंत्र्यांना काम करायचे नसेल तर मी काही करू शकत नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: July 16, 2019 4:16 AM