ज्येष्ठांचा अनादर करणारे जनतेचा काय सन्मान करणार?; अडवाणींचं तिकीट कापल्यानंतर काँग्रेसचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 08:48 AM2019-03-22T08:48:20+5:302019-03-22T08:48:30+5:30
आधी मार्गदर्शक मंडळात रवानगी, आता मतदारसंघ हिसकावला; काँग्रेसचा मोदींवर निशाणा
नवी दिल्ली: सत्ताधारी भाजपानं काल लोकसभा निवडणुकीसाठी 184 उमेदवारांची यादी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसीमधून, तर भाजपा अध्यक्ष अमित शहांना गांधीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. अमित शहा सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांना गांधीनगरमधून उमेदवारी देण्यासाठी भाजपानं ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींचं तिकीट कापलं. यावरुन काँग्रेसनं मोदी-शहांवर निशाणा साधला. जे ज्येष्ठांचा आदर करत नाहीत, ते जनतेच्या विश्वासाचा काय सन्मान करणार?, असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला.
'आधी अडवाणींची जबरदस्तीनं मार्गदर्शक मंडळात रवानगी करण्यात आली आणि आता त्यांचा मतदारसंघदेखील हिसकावून घेण्यात आला. मोदी ज्येष्ठांचा आदर करत नाहीत. मग ते जनतेच्या विश्वासाचा आदर काय करणार? भाजपा भगाओ, देश बचाओ,' असं ट्विट काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलं. काल (गुरुवारी) संध्याकाळी भाजपानं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. गांधीनगरमधून अमित शहा निवडणूक लढवणार असल्याचं भाजपाकडून जाहीर करण्यात आलं. अमित शहा पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. भाजपाचे दिग्गज नेते अडवाणी 1998 पासून या मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधीत्व करत आहेत.
पहले श्री लाल कृष्ण अडवाणी को ज़बरन ‘मार्ग दर्शक’ मंडल में भेज दिया,
— Randeep Singh Surjewala (@rssurjewala) March 21, 2019
अब उनकी संसदीय सीट भी छीन ली।
जब मोदीजी बुज़ुर्गों का आदर नहीं करते,
वह जनता के विश्वास का आदर कहाँ करेंगे?
भाजपा भगाओ,
देश बचाओ।#bjpfirstlist
अमित शहा गुजरातमधून निवडणूक लढवत असताना पंतप्रधान मोदी पुन्हा एकदा उत्तर प्रदेशातील वाराणसीमधून लोकसभेच्या रिंगणात उतरतील. भाजपाच्या पहिल्या यादीत 20 राज्यांमधील 184 उमेदवारांची नावं आहेत. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह लखनऊमधून, तर नितीन गडकरी नागपूर, व्ही. के. सिंह गाजियाबाद, सत्यपाल सिंह बागपतमधून निवडणूक लढवतील. या नेत्यांचे मतदारसंघ भाजपानं कायम ठेवले आहेत. तर केंद्रीय मंत्री स्मृती इराणी पुन्हा एकदा अमेठीत पुन्हा एकदा काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींना आव्हान देणार आहेत. इराणी गेल्या लोकसभा निवडणुकीत पराभूत झाल्या होत्या.