नवी दिल्ली: सत्ताधारी भाजपानं काल लोकसभा निवडणुकीसाठी 184 उमेदवारांची यादी जाहीर केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाराणसीमधून, तर भाजपा अध्यक्ष अमित शहांना गांधीनगरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. अमित शहा सध्या राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांना गांधीनगरमधून उमेदवारी देण्यासाठी भाजपानं ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणींचं तिकीट कापलं. यावरुन काँग्रेसनं मोदी-शहांवर निशाणा साधला. जे ज्येष्ठांचा आदर करत नाहीत, ते जनतेच्या विश्वासाचा काय सन्मान करणार?, असा सवाल काँग्रेसनं उपस्थित केला. 'आधी अडवाणींची जबरदस्तीनं मार्गदर्शक मंडळात रवानगी करण्यात आली आणि आता त्यांचा मतदारसंघदेखील हिसकावून घेण्यात आला. मोदी ज्येष्ठांचा आदर करत नाहीत. मग ते जनतेच्या विश्वासाचा आदर काय करणार? भाजपा भगाओ, देश बचाओ,' असं ट्विट काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केलं. काल (गुरुवारी) संध्याकाळी भाजपानं लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची पहिली यादी प्रसिद्ध केली. गांधीनगरमधून अमित शहा निवडणूक लढवणार असल्याचं भाजपाकडून जाहीर करण्यात आलं. अमित शहा पहिल्यांदाच लोकसभेची निवडणूक लढवणार आहेत. भाजपाचे दिग्गज नेते अडवाणी 1998 पासून या मतदारसंघाचं लोकसभेत प्रतिनिधीत्व करत आहेत.
ज्येष्ठांचा अनादर करणारे जनतेचा काय सन्मान करणार?; अडवाणींचं तिकीट कापल्यानंतर काँग्रेसचा टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 8:48 AM