गुवाहटी - भाजपा नेत्यांची बेताल वक्तव्य किंवा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर देशवासियांना संबोधित करताना भीती दाखविण्याच काम सुरूच आहे. आसाममधील मंत्री हिमांता विश्वा शर्मा यांनी पुन्हा एकदा भाजपाला निवडणूक देण्याचं आवाहन केलंय. जर पुन्हा एकदा भाजपा सत्तेत आल नाही, तर पाकिस्तानी लष्कर किंवा दहशतवादी देशाच्या संसदेवर बॉम्बहल्ला करतील, असे हिमांता विश्वा यांनी म्हटलंय.
कामपूरच्या नायगाव येथील एका सभेला संबोधित करताना सर्मा यांनी भाजपाला निवडूण देण्याचं आवाहन केलंय. देशात पुन्हा एकदा मोदी सरकार आणि आसाममध्ये भाजपा सरकार निवडूण न आल्यास पाकिस्तानकडून देशाच्या संसदेवर हल्ला करण्यात येईल. तसेच पाकिस्तानी लष्कर किंवा दहशतवाद्यांकडून आसामच्या विधानसभा सभागृहावरही हल्ला होईल आणि त्यावेळी असलेले पंतप्रधान काहीही करू शकणार नाहीत. कारण, पाकिस्तानच्या या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्याचं धाडस त्या पंतप्रधानांकडे नसणार आहे, असे म्हणत आसामचे मंत्री हिमांता विश्वा शर्मा यांनी भाजपाला मत देण्याच आवाहन केलं आहे. नवीन भारतच पाकिस्तानला समर्थपणे उत्तर देऊ शकतो, याच सरकारमध्ये पाकिस्तानला प्रत्युत्तर देण्याचं धाडस आहे, असेही शर्मा यांनी म्हटले.
पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचा जयघोष करणाऱ्या 130 नागरिकांना अटक करण्यात आली आहे. या नेटीझन्सने सोशल मीडियावरुन पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानचा उदो उदो केला होता. विशेष म्हणजे काँग्रेस अशा लोकांना पाठिशी घालत असल्याचेही शर्मा यांनी सांगितले. दरम्यान, यापूर्वी निर्मला सितारमण यांनीही आगामी लोकसभा निवडणुकांमध्ये पुन्हा एकदा मोदी सरकारला स्पष्ट बहुमत मिळणे गरजेचे असल्याचे म्हटले होते. तसेच देशात पुन्हा एकदा मोदी सरकर न आल्यास भारत देश 50 वर्षे पाठीमागे जाईल, असे सितारमण यांनी बंगळुरू येथील थिंकर फोरमच्या कार्यक्रमात बोलताना म्हटले होते. त्यानंतर, सोशल मीडियावरुन त्यांच्यावर मोठी टीका झाली होती. दरम्यान, शर्मा हे 2001 पासून 2015 पर्यंत भारतीय काँग्रेसचे सदस्य आणि आमदार होते. मात्र, मे 2016 मध्ये शर्मा यांनी भाजपाचे सदस्यत्व स्विकारले आहे.