नवी दिल्ली: पाकिस्तानकडून होणारे हल्ले गंभीरतेने घेतले नाहीत तर लवकरच दिल्लीत बसलेल्यांवर भजी तळण्याची वेळ येईल, असा टोला शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारला लगावला. ते गुरुवारी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी म्हटले की, काश्मीरमध्ये रोज भारतीय जवान शहीद होत आहेत. मंगळवारी (6 फेब्रुवारी) श्रीनगरमधील रुग्णालयात शिरून दहशतवाद्यांनी गोळीबारही केला. एवढे होऊनही आपण या गोष्टी गांभीर्याने घेतल्या नाहीत तर एक दिवस आपल्या सर्वांवर दिल्लीत बसून भज्या तळण्याची वेळ येईल, असे राऊत यांनी म्हटले. तत्पूर्वी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'तूनही केंद्र सरकारच्या काश्मीरमधील अपयशावर ताशेरे ओढण्यात आले. पाकिस्तान व त्यांचे दहशतवादी हिंदुस्थानची नाडी कश्मीरात रोज सोडत आहेत व त्यामुळे तिरंग्यास मान खाली घालावी लागत आहे. देश गंभीर संकटात असताना ‘पकोडे-भजी’ यावर चर्चेत गुंतवून ठेवायचे व कश्मीरात आमच्या जवानांनी रोजच शहीद व्हायचे. मोदी सरकारला सत्तेवर येऊन चार वर्षे झाली आहेत. कश्मीर प्रश्नाचा पकोडा उकळत्या तेलातच फुटला आहे. जवान मरत आहेत व कश्मिरी पंडित अजूनही निर्वासित आहेत असे अग्रलेखात म्हटले आहे.
Ceasefire Violation : पाकिस्तानला प्रत्युत्तर दिलं नाही तर भारताला नामर्द म्हटलं जाईल - संजय राऊत पाकिस्तानने रविवारी शस्त्रसंधीचे उल्लंघन करत जम्मू-काश्मीरमधील राजौरी व पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेजवळील भागात अंदाधुंद गोळीबार व तोफगोळ्यांचा मारा केला होता. यामध्ये भारतीय लष्कराच्या बंकर्सचे मोठे नुकसान झाले होते. या हल्ल्यात भारतीय लष्कराचा एक कॅप्टन व तीन जवान शहीद झाले. तर बीएसएफचा एक जवान व दोन मुलांसह चार जण जखमी झाले होते. याविषयी संजय राऊत यांनी संताप व्यक्त केला होता. ''शस्त्रसंधी उल्लंघनापेक्षा हे युद्धच आहे. पाकिस्तानच्या हल्ल्यांना जशास तसं उत्तर द्यायलं हवं'', अशी प्रतिक्रिया शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. जर या हल्ल्यास प्रत्युत्तर दिले गेले नाही तर भारताला जगामध्ये नामर्द म्हटले जाईल, असेही त्यांनी सांगितले होते.