नवी दिल्ली - आगामी उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकांच्या (UP Election 2022) पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपविरोधात अन्य पक्ष असाच सामना सध्यातरी दिसत आहे. भाजपनेही रणनीती आखायला सुरुवात केली असून, विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करण्यासाठी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. युपीचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते योगी आदित्यनाथ हे पंतप्रधाननरेंद्र मोदींचं कौतुक करत, आणि युपी सरकारच्या कामगिरीचा पाढा वाचत नागरिकांचं प्रबोधन करत आहेत.
योगी आदित्यनाथ यांनी हरियाणातील फरीदाबादमधील नाथ संप्रदायाच्या कार्यक्रमात संबोधित केले. त्यावेळी, मोदींवर स्तुतीसुमने उधळताना चीन आणि पाकिस्तानच्या कारवायांना भारताने दिलेल्या प्रत्युत्तराची आठवण करून दिली. जर, 2014 मध्ये नरेंद्र मोदीपंतप्रधान बनले नसते, तर चीन आणि पाकिस्तान यांनी भारताला डोळे वर करुन पाहिले असते. यापूर्वी जिन्ना समर्थकांनी रामभक्तांवर गोळ्या चालवल्या, पण आता गोळ्या दहशतवादी आणि देशद्रोह्यांवर चालवल्या जात आहेत, असे योगींनी म्हटले.
दरम्यान, यापूर्वीही उत्तर प्रदेशच्या योगी सरकारमधील एका मंत्र्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची स्तुती करताना केलेले वक्तव्य चांगलेच चर्चेत आले हते. नरेंद्र मोदी कोणी साधारण व्यक्ती नाही, तर देवाचा अवतार आहेत, असे त्यांनी म्हटले होते. उत्तर प्रदेशमधील हरदोई येथील एका जनसभेला संबोधित करताना योगी सरकारमधील मंत्री उपेंद्र तिवारी यांनी पंतप्रधान मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला. त्यावेळी, नरेंद्र मोदी हे देवाचा अवतार असून, ते प्रधानसेवकच्या रुपात काम करायला आलेत, असे त्यांनी म्हटले होते.