नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची त्या पदावर फेरनिवड झाल्यास ती या देशातील शेवटची निवडणूक ठरेल, अशी भीती राजस्थानचे मुख्यमंत्री व ज्येष्ठ काँग्रेस नेते अशोक गेहलोत यांनी व्यक्त केली आहे. मोदी निवडून आल्यास चीन व रशियामध्ये जसा एकछत्री अंमल असतो, त्या दिशेने भारताची वाटचाल सुरू होईल, असेही ते म्हणाले.त्यांनी सांगितले की, मोदींच्या राजवटीत लोकशाही, तसेच देशाचे अस्तित्व यांना गंभीर धोका निर्माण झाला आहे. पुन्हा सत्ता मिळविण्यासाठी मोदी कोणत्याही मार्गाचा अवलंब करू शकतात. आपले उद्दिष्ट साध्य करण्यासाठी मोदी पाकिस्तानशीही युद्ध पुकारू शकतात, अशी भावना जनतेच्या मनात निर्माण झाली आहे.अशोक गेहलोत यांनी म्हणाले की, चीन, रशियामध्ये एकाच पक्षाची सत्ता असते. तिथे जो राष्ट्राध्यक्ष किंवा पंतप्रधान बनतो, त्याच्या हाती निर्णय घेण्याचे अधिकार एकवटलेले असतात. तशीच परिस्थिती मोदी पुन्हा पंतप्रधान झाल्यास भारतामध्ये उद्भवू शकते. निवडणुका जिंकण्यासाठी व निवडणुकांनंतर मोदी आपले इप्सित साध्य करण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकतात.मोदींनी चित्रपट क्षेत्रात जावेअशोक गेहलोत उपरोधिक शैलीत म्हणाले की, मोदी हे कसलेले अभिनेते आहेत. राजकारणापेक्षा हिंदी चित्रपटांमध्ये ते अधिक चांगली कामगिरी बजावू शकतील. तिथे आपल्या अभिनयाचा अमीट ठसा त्यांना उमटविता येईल. खोटी आश्वासनांचे उत्तम मार्केटिंग करण्याची कला मोदींनी साध्य केली आहे.
मोदींची फेरनिवड झाल्यास ती ठरेल शेवटची निवडणूक - अशोक गेहलोत
By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2019 5:40 AM