नवी दिल्ली : आम्ही तोंड देत असलेले ताण-तणाव व व्यथा समजून घेण्यासाठी एक दिवस आमचे आयुष्य जगून बघा, असे आवाहन येथील अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेतील (एम्स) निवासी डॉक्टरांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.राजस्थानातील डॉक्टरांनी वाढीव वेतन आणि बढत्यांसाठी केलेल्या आंदोलनाला एम्सच्या डॉक्टरांनी पाठिंबा दिला. एम्स रेसिडेंट डॉक्टर्स असोसिएशनने (आरडीए) शनिवारी मोदी यांना पाठवलेल्या पत्रात सरकारी रुग्णालयांतील डॉक्टरांवर अत्यंत सामान्य सोयीसुविधा आणि आणीबाणीच्या परिस्थितीत रुग्णाच्या नातेवाईकांकडून होणारे चुकीचे वर्तन/मारहाण या परिस्थितीत असणारा प्रचंड दबाब मोदी यांनी समजून घ्यावा, असे म्हटले.तुमच्यासारखा सक्रिय पंतप्रधान आम्हाला लाभला याबद्दल आम्ही नशिबवान आहोत, असे म्हणून आरडीएचे अध्यक्ष हरजीत सिंग भट्टी यांनी या पत्रात म्हटले आहे की आता आम्ही तुम्हाला अशी विनंती करीत आहोत की आम्ही तोंड देत असलेला दबाब समजून घेण्यासाठी, उपचार मिळत नसलेल्या रुग्णांच्या व्यथा, पायाभूत सुविधा व संसाधनांअभावी खालावत चाललेली आरोग्य व्यवस्था पाहण्यासाठी तुम्ही एक दिवस सरकारी डॉक्टर या नात्याने अॅप्रन घालून काम करावे.सरकारी डॉक्टर या नात्याने तुम्ही केलेल्या एक दिवसाच्या कामामुळे आरोग्य व्यवस्थेला महत्वाचे वळण मिळेल व आरोग्य व्यवसायावरील विश्वासही पूर्ववत होईल, असे पत्रात म्हटले आहे.
मोदींनी डॉक्टर व्हावे, तरच समजतील व्यथा,एम्सच्या निवासी डॉक्टरांचे पत्राद्वारे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 25, 2017 2:06 AM