शीलेश शर्मा,
नवी दिल्ली- उत्तराखंड आणि अरुणाचल प्रदेशातील लोकनियुक्त सरकारे पाडण्यात भाजप व त्याच्या केंद्रातील सरकारचा हात असल्याचा काँग्रेसचा आरोप गृहमंत्री राजनाथसिंह यांनी मंगळवारी फेटाळून लावला. नावेला छिद्र असेल, तर ती पाण्यात बुडणारच. पाण्याला दोष देणे बरोबर नाही, अशा शब्दांत राजनाथ यांनी उत्तराखंड व अरुणाचलमधील संकटाचे माप काँग्रेसच्या पदरात टाकले. काँग्रेसमधील अंतर्गत कलहातून हा प्रकार घडल्याचे ते म्हणाले. तत्पूर्वी, काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करताना भाजप सरकारवर जोरदार हल्ला चढविला. ते म्हणाले की, काँग्रेसमुक्त भारताची घोषणा घेऊन सत्तेचा दुरुपयोग करीत लोकनियुक्त सरकारे पाडली जात आहेत. मणिपूर, हिमाचल प्रदेश येथील सरकारेही पाडण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र, त्यात त्यांना यश आले नाही. राज्यघटना व लोकशाही तत्त्वाला फाटा देऊन जेथे बहुमत नाही तेथेही तोडफोड करून सरकार बनविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. सुप्रीम कोर्टाने ऐतिहासिक निर्णय दिला असूनही सरकार बोध घ्यायला तयार नाही. या मुद्यावर काँग्रेसने स्थगन प्रस्ताव दिला होता. मात्र, लोकसभा अध्यक्षांनी तो फेटाळत शून्य प्रहरात खरगे यांना म्हणणे मांडण्याची मुभा दिली. खरगे सरकारवर हल्ला करीत असताना सभागृहात अनेकदा गोंधळ झाला. खरगे यांनी उपस्थित केलेल्या मुद्यावर बोलताना राजनाथसिंह यांनी सरकारचा भक्कमपणे बचाव केला. या प्रकरणात केंद्राची काहीही भूमिका नाही. त्यामुळे याबाबत केंद्रावर आरोप करणे ठीक नाही. काँग्रेस सरकारने आतापर्यंत १०५ वेळा कलम ३५६ चा वापर करून राज्य सरकारे पाडली आहेत. गृहमंत्र्यांच्या या निवेदनाला प्रत्युत्तर देताना काँग्रेसचे सदस्य गौरव गोगाई म्हणाले की, येथे कलम ३५६ चा वापर करून सरकार पाडण्याच्या मुद्यावर चर्चा सुरू नसून केंद्राने राज्य सरकारे पाडण्यास राज्यपालांसारख्या घटनात्मक पदाचा कसा दुरुपयोग केला यावर चर्चा सुरू आहे. >केरळच्या २१ बेपत्ता लोकांचा मुद्दा लोकसभेतकेरळमधून बेपत्ता झालेल्या व दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटमध्ये (आयएस) सहभागी झाल्याचा संशय असलेल्या २१ जणांचा मुद्दा मंगळवारी लोकसभेत राज्यातील सदस्यांनी उपस्थित केला. हे बेपत्ता लोक बंदी असलेल्या कोणत्याही संघटनेत दाखल झाले आहेत का याची खातरजमा सरकारने करावी, अशी मागणी त्यांनी केली. काही दहशतवादी संघटनांमध्ये हे बेपत्ता लोक सामील झाल्याची खात्री न मिळालेली वृत्ते प्रसारमाध्यमांत आली आहेत. त्यामुळे सरकारने राष्ट्रीय तपास यंत्रणेकडूनच त्याला दुजोरा मिळवून घ्यावा, असे काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल म्हणाले. इस्लामची भीती घालण्याचा हेतुत: प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.