मोदींना पुन्हा पंतप्रधान करण्यामागे कोणाचा हात? अरविंद केजरीवाल यांनी दिले उत्तर
By ऑनलाइन लोकमत | Published: May 10, 2019 10:02 PM2019-05-10T22:02:28+5:302019-05-10T22:07:23+5:30
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी काँग्रेस, भाजपवर जोरदार टीका केली.
नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शुक्रवारी काँग्रेस पक्षावर जोरदार टीका केली. त्यांनी काँग्रेसवर विरोधी पक्षांना कमजोर केल्याचा आरोप केला. जर नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर त्याला केवळ काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी जबाबदार असणार असल्याचा आरोप केला.
केजरीवाल यांनी सांगितले की, काँग्रेसने उत्तर प्रदेशमध्ये सपा-बसपा महाआघाडी, केरळमध्ये डावे, बंगालमध्ये तृणमूल, आंध्रप्रदेशात तेलगू देसम पार्टी आणि दिल्लीमध्ये आपला कमजोर करण्याचे काम केले आहे. काँग्रेस होणारे काम बिघडवण्याचे काम करत आहे. या राज्यांत असे वाटत आहे की, काँग्रेस पक्ष भाजपा नाही तर विरोधी पक्षांविरोधात निवडणूक लढवत आहे, अशी टीका केजरीवाल यांनी केली.
केजरीवाल यांनी सांगितले की, मोदी कोणत्याही क्षेत्रात काहीही करण्यास अपयशी ठरले आहेत. यामुळे त्यांनी बनावट राष्ट्रवादाचे ढोंग रचले आहे. त्यांचा राष्ट्रवाद देशासाठी धोक्याचा आहे. मोदींपेक्षा माजी पंतप्रधान मनमोहन सिंह 1000 पटींनी चांगले होते. मोदींकडे दाखवायला काही कामे नाहीत म्हणून मते मिळविण्यासाठी सैन्याचा वापर करत आहेत, अशी टीकाही त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर केली.
भाजपा आता सत्तेत येणार नाही. आमचा उद्देश मोदी आणि शहा यांना सत्तेत येण्यापासून रोखणे हा आहे. यासाठी आम्ही कोणालाही समर्थन देण्यास तयार आहोत. महिन्यापूर्वी वाटत होते की दिल्लीमध्ये कडवी टक्कर मिळेल. मात्र, 10 दिवसांत ही स्थिती पूर्णपणे बदलली आहे. 2015 सारखे वातावरण दिसत आहे. जेव्हा आणि दिल्लीमध्ये 67 जागा जिंकल्या होत्या. जर आम्ही सातही सीट जिंकल्या तर आश्चर्य वाटणार नाही, असा दावाही त्यांनी केला.
आप राज्यात केलेल्या कामांवर मते मागत आहे, असेही त्यांनी सांगितले.