राजकीय दृष्ट्या संवेदनशील असलेल्या बिहारमध्ये मोठ्या राजकीय घडामोडी होण्याचे संकेत मिळू लागले आहेत. गुरुवारी राजधानी पाटणा येथे दिवसभर बैठकांचे सत्र सुरू राहिल्यावर आता या बैठकांचे लोण दिल्लीपर्यंत पसरले आहे. तसेच बिहारचे मुख्यमंत्री आणि जेडीयूचे अध्यक्ष नितीश कुमार हे लवकरच मोठा निर्णय घेणार असल्याची शक्यता बोलून दाखवली जात आहे.
बिहारमधील सत्ताधारी महाआघाडीमधील मित्रपक्ष असलेल्या जेडीयू आणि आरजेडीमध्ये चाललेल्या वेगवेगळ्या बैठकांनंतर आज दिल्लीमध्ये दिवसभर भाजपाच्या दिग्गजांच्या बैठका सुरू होत्या. आता नितीश कुमार हे लवकरच महाआघाडी सोडून पुन्हा एनडीएमध्ये येऊ शकतात, अशी शक्यता वर्तवली जात आहे. मात्र भाजपाने सध्या तयार केलेल्या फॉर्म्युल्यानुसार त्यांना मंत्रिपद सोडून केंद्रीय मंत्री बनावे लागेल. असं झाल्यास भाजपाकडून मुख्यमंत्रिपदासाठी कुणाची नावं पुढे केली जातील, याबाबत उत्सुकता आहे. त्यात सध्या भाजपाचे बिहारचे प्रदेशाध्यक्ष सम्राट चौधरी, केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय आणि राज्यसभा खासदार सुशीलकुमार मोदी यांचा समावेश आहे.
सध्या सम्राट चौधरी, नित्यानंद राय आणि सुशील कुमार मोदी दिल्लीमध्ये भाजपाच्या केंद्रीय नेत्यांसोबत बिहारमधील राजकीय परिस्थितीबाबत चर्चा करत आहेत. यामधील सुशीलकुमार मोदी हे आधीपासूनच दिल्लीमध्ये होते. तर सम्राट चौधरी पाटणा येथून दिल्लीत आले आहेत. आता सांगण्यात येतंय की, गुरुवारी सम्राट चौधरी ज्या विमानातून पाटणा येथून दिल्लीला आले. त्याच विमानामधूननितीश कुमार यांचे राजकीय सल्लागार आणि जेडीयूचे राष्ट्रीय प्रवक्ते के. सी. त्यागी हे दिल्लीला आल्याचे सांगण्यात येत आहे. तसेत नित्यानंद राय यांनाही या बैठकांमध्ये सहभागी करून घेण्यात आले होते.