थांबा न मिळाल्यास महामार्गावरील वाहतूक बंद करणार: कोकाटे
By admin | Published: March 23, 2016 12:09 AM
मोडनिंब:
मोडनिंब: मोडनिंब बसस्थानकात 15 एप्रिलपूर्वी बस थांबण्यास सुरूवात न झाल्यास महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात येईल, असा इशारा निवेदनाद्वारे भाजपा प्रदेश कार्यकारिणी सदस्य संजय कोकाटे यांनी दिला आहे.यावेळी भाजपाचे तालुकाध्यक्ष विनायक भगत, तालुका उपाध्यक्ष शीतल महाडिक, शहराध्यक्ष धनाजी लादे, राहुल केदार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष एकनाथ सुर्वे, चंद्रकांत गिड्डे उपस्थित होते. हे निवेदन केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना देण्यात येणार असल्याचेही कोकाटे यांनी सांगितले. मोडनिंब येथे उड्डाण पूल झाल्यामुळे व रेल्वे गेट कायमस्वरूपी बंद होणार असल्यामुळे येथील नागरिकांसह अरण, भेंड, व्हळे, वरवडे, बावी, पडसाळी, लऊळ, तुळशी, सोलंकरवाडी, जाधववाडी मो., बैरागवाडी या भागातील नागरिकांसह पंढरपूर तालुक्यातील बार्डी, करकंब या भागातील नागरिकांना सोलापूर, पुणे, मुंबईकडे जाण्यासाठी मोडनिंबला जावे लागते. मात्र सध्या बसस्थानकात एकही बस येत नाही. यासाठी पुलावरून जावे लागते. बसस्थानकाकडे येणारा रस्ता नसल्यामुळे सर्व प्रवाशांना बसस्थानकापासून एक. कि. मी. अंतरावर बसची वाट बघत थांबावे लागत आहे. बस उतरण्यासाठी रॅम्प तयार करावा, अशी मागणी करण्यात आली असून, निवेदन जिल्हाधिकारी व तहसीलदारांनाही देण्यात आले आहे.