अजय बुवा
फोंडा (गोवा) : लतादीदींचे माझ्यावर अमाप असे ऋण आहे. मधुचंद्र चित्रपट पूर्ण झाल्यानंतर पिक्चरची सर्वत्र वाहवा झाली. त्यावेळी वाटले होते की माझ्या यशाचा वेरू चौफेर उधळेल. परंतु तसे झाले नाही. मधुचंद्र नंतर माझ्याकडे आठ महिने काहीच काम नव्हते. लग्न झालेले असल्याने डोळ्यासमोर प्रापंचिक प्रश्नांचा डोंगर होता. भविष्यातील अगणित डोळ्यासमोर प्रश्न गोंगावू लागले होते. त्यावेळी भालजी पेंढारकरच्या प्रयत्नातून अप्रत्यक्षपणे लता दीदींशी अप्रत्यक्ष संपर्क आला. त्यांनी मला काम देण्याची शिफारस भालजींकडे केली. भालजीनी त्यांच्या विनंतीला मान देऊन एक चित्रपट मला दिला. घरची राणी चित्रपट स्वतः बनवला आणि चित्रपटाने पुन्हा प्रथम क्रमांक पटकावला. राजदत्त पुन्हा उभा राहू शकले. याचे संपूर्ण श्रेय लता मंगेशकर यांनाच जाते. अशा शब्दात ज्येष्ठ दिग्दर्शक राजदत्त यांनी फोंड्यात आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. चतुरंग संस्थेने यंदाचा जीवनगौरव पुरस्कार राजदत्त यांना बहाल केला. त्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते.
यावेळी बोलताना ते पुढे म्हणाले की हातात काहीच काम नसल्याने एक दिवस सुलोचना बाईकडे माझ्या व्यथा मांडल्या. त्यावेळी त्यांनी कोल्हापुरात भालजी पेंढारकर यांना भेटायला सांगितले. भालजींना सर्व काही सांगितल्यानंतर भालजी म्हणाले सध्या मी तुला दिग्दर्शक म्हणून काम देऊ शकत नाही आणि तूला सहाय्यक म्हणून काम देणे मनाला पटत नाही. कारण तू दिग्दर्शक म्हणून मधुचंद्र मधून तुझी स्वतःची ओळख निर्माण केली आहेस. पुन्हा सहाय्यक दिग्दर्शक बनल्यास तुझे नावाची झळाळी खाली येऊ शकते. तिथून परत झेप घ्यायला वेळ लागू शकतो. तेव्हा सहाय्यक दिग्दर्शकाचे वेड सोडून दे. पाहिजे असल्यास मी तुला प्रापंचिक खर्चासाठी महिन्याला शंभर दीडशे रुपये पाठवून देत राहीन. त्यावेळी मी त्यांना सांगितलं की तुम्ही मदत किती दिवस करणार आणि परत तुमची मदत एक ना एक दिवस परत फेडायचिच आहे.
जुन्या आठवणींना दिला उजाळा त्यावेळी त्यांनी सांगितले की तसे तर एक काम कर माझ्याजवळ काही स्क्रिप्ट आहेत. त्या वाचून काढ. त्या स्क्रिप्टवर टिप्पण काड. आणि तुला आवडेल ते स्क्रिप्ट शोधून काढ. मी निरंतर त्यांच्या स्क्रिप्ट वाचायला सुरुवात केल्या. टिप्पणं काढायला लागलो. ते अधेमधे येऊन चौकशी करायचे. एक दिवस मी त्यांना सांगितले की घरची राणी ही स्क्रिप्ट मला आवडलेली आहे. कारण त्यात भालजींचं वेगळेपण लपलेलं आहे. भालजींनी मग मला त्याच स्क्रिप्टवर चित्रपट काढण्यासाठी पूर्ण स्वतंत्र दिले. चित्रपट तयार झाला व चित्रपटाला पहिला क्रमांक मिळाला. त्यावेळेस स्पर्धेत माझे गुरु राजा परांजपे, माझ्या गुरूंचे गुरु भालजी पेंढारकर यांचे चित्रपट सुद्धा होते. त्या सर्व चित्रपटावर भारी ठरत घरची राणी अव्वल ठरला.
चित्रपटाला अव्वल क्रमांक मिळाल्यानंतर भालजीना भेटायला गेलो. त्यांचे चरण स्पर्श केल्यावर ते म्हणाले ह्या चित्रपटाचे खरे श्रेय द्यायचे असेल तर लता मंगेशकर यांना दे. कारण त्यांच्यामुळेच हा चित्रपट तुला मिळाला आहे. मी त्यावेळी पुरता गोंधळून गेलो की लता मंगेशकर हे नाव इथे कुठे आले. त्यावेळी भालजीनी मला सांगितलं की तू ज्यावेळी माझ्याकडे काम मागत होतास, त्यावेळी त्या आतल्या खोलीत बसल्या होत्या. तुझी कळवळ त्यांच्या कानी पडली व त्यांनीच मला तुला चित्रपट द्यायला सांगितला. चित्रपटात सगळा पैसा त्यांनीच गुंतवला. जाऊन त्यांचे चरण स्पर्श कर. मी मुंबई गाठली व लता दीदींना भेटलो. त्यावेळी साक्षात परमेश्वराला भेटल्याचा आनंद झाला आणि त्याचवेळी गोव्याच्या मातीची आठवण झाली. कारण गोव्याच्या मातीतील हेच तर वेगळेपण आहे. लता दिदिनी सगळा पैसा गुंतवला पण आपले नाव कुठेच येऊ दिले नाही.
ज्यावेळी गोवा मुक्ती संग्राम साठी आम्ही तयारी करत होतो त्यावेळी सुधीर फडके हे गीत मधून जागृती करण्यासाठी प्रयत्न करत होते. त्यावेळी पैशांची चणचण भासत होती .त्यावेळेस सुद्धा लता मंगेशकर यांनी सुधीर फडके यांना सांगितले पैशांची चिंता तुम्ही करू नका. तुम्ही गाणी तयार करा. गोवा स्वतंत्र व्हायला पाहिजे. अप्रत्यक्षपणे लता मंगेशकर यांचा सुद्धा गोवा मुक्ती संग्रामात सहभाग आहे तो असा. परंतु त्यांनी जी काही आर्थिक मदत केली तिची कुठेच वाच्यता केली नाही. आज लतादीदी नाहीत म्हणून सर्वा समक्ष मी हा गौप्यस्फोट करतोय. जाहीर करतो की त्यावेळी गोवा मुक्ती संग्राम साठी तयार झालेल्या गाण्यासाठी सर्व काही पैसा हा लता मंगेशकर यांनीच दिला होता. आज त्यांच्याच भूमीत जीवनगौरव पुरस्कार घेताना मला अत्यानंद होत आहे .कदाचित लता दिदी वर बसून हा सोहळा बघत असतील व त्यांनाही कदाचित कृतार्थ झाल्यासारखे वाटत असेल.
गोवा मुक्ती संग्राम लढ्या संदर्भात ते म्हणाले की 'सारा देश स्वतंत्र झाला होता पण गोवा पाला पाचोळा होऊन पडलेला होता. हा पाचोळा दूर कसा करायचा याचा विचार आम्ही तरुण मंडळी करत होतो.19 54 साली दादरा नगर हवेली पासून आमचा प्रवास सुरू झाला तो थेट गोवा मुक्ती पर्यंत येऊन पोहोचला. मुक्ती संग्रामाची चळवळ करताना अनेकांचे प्रयत्न होते. अक्षरशः गोवर्धन पर्वत उचलला जाण्याचा तो प्रयत्न होता. कुणाची बोटे लागली, कुणाचे हात लागले, तर कुणाचा माथा लागला. शेवटी गोवा मुक्त झाला त्यावेळी मनात एकच भावना होती. मा तेरे पावन पूजा मे हम केवल इतना कर पाये. युवकांना संदेश देताना ते म्हणाले भाषा, शब्द, विचार हे सर्व ह्या हृदयापासून त्या हृदयापर्यंत पोहोचले पाहिजे या भावनेतून जगण्याचा प्रयत्न करा .मी तो केला म्हणूनच आज इथपर्यंत प्रवास करू शकलो.