नवी दिल्ली - उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी दिवंगत विहिंप नेते अशोक सिंघल यांच्यावर आधारित लिहिण्यात आलेल्या पुस्तक प्रकाशन सोहळ्यादरम्यान 'वंदे मातरम्' वरुन सुरू असलेल्या वादावर भाष्य केले. ''वंदे मातरम् गाण्यास लोकांना काय समस्या आहे. 'वंदे मातरम्'वरुन वादविवाद होताना दिसत आहेत. माँ तुझे सलाम, मातेला सलाम नाही करणार तर मग कुणाला करणार? अफझल गुरूला सलाम करणार का?'', असे वक्तव्य करत व्यंकय्या नायडू यांनी 'वंदे मातरम्' न गाणा-यांवर हल्लाबोल चढवला आहे.
वंदे मातरम् म्हणजे मातृभूमीचे नमनं करणं असे सांगत नायडू पुढे म्हणाले की, ''जेव्ही कुणी भारत माता की जय असे म्हणतं, तेव्हा याचा देवांसोबत काहीही संबध नसतो. यावेळी नायडू यांनी 1995 साली सुप्रीम कोर्टाकडून हिंदुत्ववर देण्यात आलेल्या निर्णयाचं उदाहरण देत म्हटले की, हिंदू एक धर्म नाही तर जीवन जगण्याची पद्धत आहे. हिंदू धर्म संकुचित संकल्पना नसून, हिंदू धर्म हा देशाचा एक व्यापक सांस्कृतिक असा अर्थ आहे. हिंदू धर्म भारताची संस्कृती आणि परंपरा आहे''.
भारतीयांच्या अहिंसक स्वभावाचे कारणदेखील हिंदू धर्म असल्याचे यावेळी त्यांनी सांगितले. ''प्रत्येकाने भारतावर हल्ला केला, शासन केले, नुकसान करत लूटलंदेखील केली. मात्र भारतानं आपल्या संस्कृतीमुळे कोणत्याही देशावर हल्ला केलेला नाही. आपली संस्कृती आपल्याला 'वसुधैव कुटुम्बकम' ची शिकवण देते. याचा अर्थ संपूर्ण जग एक कुटुंब आहे, असा होतो''.