नवी दिल्ली - मध्यप्रदेशात राजकीय घडामोडींना वेग आला असताना फरार झालेल्या आमदारांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. आमचे अपहरण झाले नसल्याचे आमदारांनी आज स्पष्ट केले. बंगळुरू येथे आयोजित पत्रकार ते बोलत होते.
आम्ही बंगळुरू येथे आमच्या इच्छेने आलो आहोत. कमलनाथ सरकारच्या कार्यशैलीमुळे आम्ही नाराज असून आम्ही सर्व आमदार एकत्र असल्याचे स्पष्ट करण्यात आले. पत्रकार परिषदेला सर्वच्या सर्व 22 आमदार उपस्थित होते.
बंडखोर आमदारांनी म्हटले की, आम्हाला अपरिहार्यतेतून राजीनामा द्यावा लागला. आम्ही बंदी नसून स्वखुशीने येथे आलो आहोत. ज्योतिरादित्य शिंदे यांच्यावर हल्ला होऊ शकतो, तर आम्ही सुरक्षीत कसे असू असा सवालही त्यांनी उपस्थित केला. त्यामुळे आम्हाला केंद्रीय सुरक्षा मिळायला हवी, अशी मागणी आमदारांकडून करण्यात आली आहे.
बंडखोर आमदार इमरती देवी म्हणाल्या की, ज्योतिरादित्य शिंदे हेच आमचे नेते आहेत. त्यांच्याकडून आम्ही बरच काही शिकलो आहोत. मी कायम त्यांच्यासोबत आहे. त्यांनी विहिरीत उडी मारण्याचा आदेश दिला तर आपण तेही करू असंही इमरती देवी म्हणाल्या.