ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 30 - भारतीय हवाई दलाने 1984 साली पाकिस्तानच्या अणवस्त्र प्रकल्पांवर हल्ला करण्याची तयारी केली होती अशी माहिती सीआयएच्या गोपनीय कागदपत्रातून समोर आली आहे. सीआयए या अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेने त्यावेळी मिळवलेल्या माहितीमधून तसा निष्कर्ष काढला होता.
तत्कालिन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर सीआयएने गुप्चर माहितीचे विश्लेषण करुन हा निष्कर्ष काढला होता. भारताने असा हल्ला चढवला असता तर पाकिस्तानचे अणवस्त्र प्रकल्प पूर्णपणे नष्ट झाले असते किंवा मोठया प्रमाणावर हानी पोहोचवून अनेक वर्षापर्यंत पाकिस्तानला अणवस्त्र तंत्रज्ञानापासून वंचित ठेवता आले असते.
भारतीय हवाई दल त्यावेळी मिग-29 लढाऊ विमान ताफ्यात दाखल होण्याच्या प्रतिक्षेत होते. अमेरिकेच्या एफ-16 पेक्षा मिग-29 अधिक अत्याधुनिक होते. पाकिस्तानकडे त्यावेळी एफ-16 लढाऊ विमाने होती. सीआयएनुसार काहुता आणि पीनस्टेच असे ते दोन प्रकल्प होते.
विमानाने भारतापासून अर्ध्यातासाच्या अंतरावर हे दोन्ही प्रकल्प होते. त्यावेळी पाकिस्तानपेक्षा भारतीय हवाई दल अधिक सामर्थ्यवान आणि सशक्त होते. भारताने असा हल्ला केला असता तर पाकिस्तानला आपल्या प्रकल्पाचे रक्षण करता आले नसते असा सीआयएचा निष्कर्ष होता.